गांधीनगर – गुजरात विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असताना कॉंग्रेस पक्षाला एक जबर दणका बसला आहे. या पक्षाचे गुजरातचे कार्यकारी अध्यक्ष जिग्नेश मेवानी यांना 2016 च्या एका प्रकरणात सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यासह 19 जणांना अहमदाबाद येथील न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.
बेकायदा जमाव जमवणे आणि दंगा भडकावणे या आरोपांखाली त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. मुख्य न्यायाधीश पी. एन. गोस्वामी यांनी मेवानी यांना दंडही ठोठावला आहे. दरम्यान, मेवानी यांना वरच्या न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी 17 ऑक्टोबरपर्यंत न्यायायाने ही शिक्षा स्थगित ठेवली आहे. गुजरात विद्यापीठाच्या कायदा विभागाच्या एका इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको केल्याचे हे प्रकरण आहे.
बेकायदा सभा घेणे आणि दंगल भडकवणे आदी आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेवानी यांच्यासह ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यातील एका आरोपीचे निधन झाले आहे. मेवानी हे दलित समुदायातील नेते असून 2017 ची गुजरात विधानसभा निवडणूक त्यांनी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून लढवली होती.