पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील मोठ्या हौसिंग सोसायट्यांना कम्पोस्टिंग प्लाण्ट सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शहरातील केवळ 146 हौसिंग सोसायट्यांनी कंपोस्टिंग प्लॅण्ट उभारले असून 480 हौसिंग सोसायट्यांनी या प्रकल्पाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या आदेशाला या सोसायट्यांनी केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात दररोज अकराशे टन कचरा जमा होत आहे. दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने मोठ्या प्रमाणावर कचरा उत्पन्न करणाऱ्या हौसिंग सोसायट्यांनी ओला, सुका आणि घरगुती घातक कचरा विलगीकरण करावा, तसेच ओल्या कचऱ्यावर स्वतःच्या परिसरामध्ये कंपोस्टिंग करणे बंधनकारक केले आहे. परंतु शहरातील 626 हौसिंग सोसायट्यांपैकी 146 सोसायट्यांनी सध्या कंपोस्ट प्लॅण्ट कार्यान्वित केले आहेत. 480 हौसिंग सोसायट्यांकडे कंपोस्टिंग प्लॅण्ट उभारलेले नाहीत.
अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या 28 सोसायट्यांपैकी 18 सोसायट्यांमध्ये कंपोस्ट प्लॅण्ट आहेत, तर ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 47 पैकी 12 सोसायटींमध्ये प्रकल्प आहे, तसेच क क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकूण 80 सोसायट्या आहेत. त्यापैकी केवळ 35 सोसायट्यांमध्ये कंपोस्ट प्लॅण्ट आहे. ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत्र सर्वाधिक 296 सोसायट्या आहेत. त्यातील केवळ 54 सोसायट्यांत हा प्रकल्प आहे. ई क्षेत्रीय कार्यालयातील 76 सोसायट्यांमधील 5 सोसायट्या तर ग क्षेत्रीय कार्यालयातील 79 सोसायट्यांपैकी 7 सोसायट्यांमध्ये हा प्रकल्प सुरू आहे. फ क्षेत्रीय कार्यालयातील 11 पैकी 9 सोसायट्यांनी हा प्रकल्प उभारला आहे.
ह क्षेत्रीय कार्यालयातील 9 सोसायट्यांपैकी 6 सोसायट्यांमध्ये ओला कचरा कंपोस्ट करण्यात येत आहे. आयुक्तांनी मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना कम्पोस्टिंग प्लाण्ट उभारण्याचे आदेश काढले आहेत. परंतु ज्या सोसायट्या कचरा विलगीकरण करून कम्पोस्टिंग करत नाहीत, अशा एकाही सोसायटीवर महापालिकेने अद्याप कारवाई केली नाही. त्यामुळे या सोसायट्या प्रकल्प उभारण्याकडे दूर्लक्ष करत असल्याचे सांगण्यात येत आहे.