जयपूर – देशभरामध्ये आज स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशा उदात्त मूल्यांनी भारत देशाची पायाभरणी करण्यात आली आहे. मात्र हीच मूल्य देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७५ वर्षांनंतर देखील पायदळी तुडवली जातात ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. याचेच ताजे उदाहरण राजस्थानातील जालोर जिल्ह्यातून समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार, येथे एका ९ वर्षांच्या दलित चिमुरड्याने पिण्याच्या पाण्याच्या माठाला हात लावला म्हणून त्याचा जीव घेण्यात आला आहे. या धक्क्यामध्ये अधिक भर घालणारी बाब म्हणजे हे हैवानी कृत्य करणारा त्या चिमुरड्याचा शिक्षक आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुराना गावातील सरस्वती विद्या मंदिर या खासगी शाळेमध्ये १५ जुलै रोजी एका ९ वर्षीय दलित विद्यार्थ्याला छैल सिंग नामक शिक्षकाने बेदम मारहाण केली. या चिमुरड्याचा दोष इतकाच होता की, त्याने दलित कुटुंबात जन्म घेतला असताना देखील शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या मठाला हात लावला व त्यातील पाणी पिले.
दलित विद्यार्थ्याने पाणी पिल्याचे शिक्षक छैल सिंग याच्या लक्षात येताच त्याने त्याला बेदम मारहाण केली. शिक्षकाने केलेल्या मारहाणीत या चिमुरड्याला गंभीर अंतर्गत जखमा झाल्या होत्या. प्रथम त्याला जलोर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने पुढे त्याला उदयपूर व अहमदाबाद येथे हलवण्यात आले.
मात्र हैवान शिक्षकाने केलेल्या मारहाणीत या चिमुरड्याच्या कानाच्या नसांमध्ये गंभीर दुखापत झाली होती. यातच त्याचा शनिवार १३ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. मृत चिमुरड्याने वडील देवा राम यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सायला पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या ३०२ कलमांतर्गत खुनाचा गुन्हा व ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर जालोरचे पोलीस अधीक्षक हर्षवर्धन अग्रवाला यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. मृत चिमुरड्याच्या कुटुंबियांना आरोप केल्याप्रमाणे प्रकरणाला जातीय अंग आहे का याचाही पोलीस तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रकरणाची दखल घेत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पीडित परिवाराला ५ लाखांची मदत जाहीर करत दोषींना लवकरात लवकर शासन करण्यात येईल असे आश्वासन दिले.
जालौर के सायला थाना क्षेत्र में एक निजी स्कूल में शिक्षक द्वारा मारपीट के कारण छात्र की मृत्यु दुखद है। आरोपी शिक्षक के विरुद्ध हत्या व SC/ST एक्ट की धाराओं में प्रकरण पंजीबद्ध कर गिरफ्तारी की जा चुकी है।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) August 13, 2022