पुणे : चॉकलेटच्या अमिषाने साडेपाच वर्षाच्या चिमुकलीला दुकानात बोलवून तिचा विनयभंग़ करणाऱ्या 67 वर्षीय नराधमाला 1 वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश आर.व्ही. अदोणे यांनी सुनावली.
दंडापैकी पाच हजार रुपये पीडितेला देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. लालसाहब लाडलेसाहब शिवनगी ( रा. उरावडे, ता. मुळशी) असे त्यांचे नाव आहे.
पीडितेच्या आईने याबाबत पौड पोलिसात फिर्याद दिली होती. ही घटना 23 जुलै 2017 रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले.
त्यांना पौड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक विजय चौधरी यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. चिमुकलीला दुकानात बोलावून त्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पौड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने विनयभंग या कलमानुसार शिक्षा आणि दंड सुनावला. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.