48 वर्षांपुर्वी प्रभात : मुळानदीकाठची 250 फूट लांबीची भिंत पार कोसळली

पुणे, ता. 10 – आज पहाटे नव्या पुलाच्या उजव्या बाजूकडील 100 फूट रस्त्यावरील मुठा नदीकाठची सुमारे 250 फूट लांबीची भिंत पार कोसळली व सुमारे 1 लक्ष रुपयांचा महापालिकेला फटका बसला. हा रस्ता मदारी मेहतर पुलाकडे जाणारा असून तो सध्या सुमारे 80 फूट आहे.

हा रस्ता तयार करताना खाली केवळ मातीचे भराव असल्याने व त्यातून कसबा पेठविभागातून येणाऱ्या गटाराचे पाणी झिरपून पोकळी झाली असावी व त्याचा तडाखा या संरक्षक भिंतीस बसून ही भिंत कोसळली असावी, असा अंदाज व्यक्‍त केला आहे.

ही संरक्षक भिंत 1300 फूट लांबीची असून रस्ता व भिंतीसाठी 16 लक्ष रुपये खर्च आलेला होता. ती चार वर्षांपूर्वी बांधली गेली.

बॉम्बहल्ल्यामुळे इस्रायलचा रेडक्रॉसकडून धिक्‍कार

जीनिव्हा – कैरो व दमास्कस या शहरांवर काल इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्याचा आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसने धिक्‍कार केला आहे. या बॉम्बहल्ल्यात कित्येक नागरिक मरण पावले. लष्करी हालचालीपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे व युद्धबळींना साहाय्य मिळावे या जीनिव्हा कराराची अंमलबजावणी करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

युद्ध थांबविण्याचे कामी भारत असमर्थ

गोहत्ती – पंतप्रधान इंदिरा गांधींनी मध्यपूर्वेतील परिस्थितीबाबत खद व्यक्‍त केला आहे. हे युद्ध थांबविणे भारताच्या हाती नाही. अरबांनी व इस्रायलने त्याबाबत निर्णय घ्यावयाचा आहे, असे इंदिरा गांधी म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.