अवघ्या 19 वर्षांच्या युवकाने उघडली स्टेट बॅंकेची बोगस शाखा

कडलोर (तामिळनाडू) : तामिळनाडूच्या कडलोर जिल्ह्यातील पानरुती येथे चक्क स्टेट बॅंक ऑफ इंडियाची बोगस शाखा उघडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली असून या कटाचा म्होरक्‍या एका बॅंक कर्मचाऱ्याचा अवघा 19 वर्षीय मुलगा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कमल बाबू हा बॅंक कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. त्याचे वडील 10 वर्षापुर्वी निर्वतले आहेत. त्याची आई बॅंकेतून दोन वर्षापुर्वी निवृत्त झाली आहे. सध्या बेकार असणाऱ्या कमलच्या डोक्‍यात बोगस बॅंक उभारण्याची सुपिक कल्पना आली.

ही बॅंक तीन महिन्यापुर्वी उघडण्यात आली. मात्र काही खातेदारांनी दुसऱ्या शाखेच्या व्यवस्थापकाला याची माहिती दिली. त्यावेळी हा प्रकार उघड झाला. या शाखा व्यवस्थापकाने विभागीय कार्यालयाकडे नवी शाखा सुरू केली आहे का? याची विचारणा केली. त्यावेळी या गावात केवळ दोन शाखाच अधिकृत आहेत. तिसरी शाखा नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.

शाखाव्यवस्थापकांनी या शाखेला भेट दिली त्यावेळ ते देखील आश्‍चर्यचकीत झाले. कारण ही शाखा अन्य एखाद्या खऱ्या शाखेप्रमाणे हुबेहूब होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली.

कमलबाबू या म्होरक्‍याशिवाय पोलिसांनी मणीक्कम (वय 52) हा स्टॅम्प बनवणारा आणि कुमार (वय 42) या प्रिटिंग प्रेस मालकाला अटक केली आहे. या शाखेतून अद्याप कोणताही व्यवहार झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे अद्याप कोणाचीही फसवणूक झाली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.