बजरंगी भाईजानचा प्रत्यक्ष अनुभव

पाकिस्तानातील 17 वर्षाच्या मुलाला 2 वर्षांनी परत पाठवले

चंदिगड – चुकून सीमा ओलांडून भारतीय हद्दीमध्ये आलेल्या पाकिस्तानातील 17 वर्षीय मुलाला जवळपास 2 वर्षांनी आज परत पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आले. कुटुंबीयांशी 2018 मध्ये झालेल्या भांडणानंतर हा मुलगा घराबाहेर पडून भटकत होता. तेंव्हा चुकून तो भारतीय हद्दीमध्ये शिरला होता.

बिलाल या मुलाचे नाव असून त्याला मुबारक असेही संबोधले जात आहे. त्याला सीमा सुरक्षा दलाने दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी रेंजर्सच्या स्वाधीन करण्यात आले. कुटुंबीयांशी भांडण झाल्यानंतर आपण रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे बिलालने सांगितले. भटकत असताना आपण भारतीय हद्दीमध्ये शिरल्याचे आपल्याला समजले नाही. त्यानंतर आपल्याला बीएसएफच्या जवानांनी पकडल्याचेही त्याने सांगितले.

त्याला पंजाबमधील तरन तारन जिल्ह्यातल्या खेमकरन गवात पकडले गेले होते. त्याच्यावर विदेशी नागरिक कायदा आणि पासपोर्ट कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला गेला होता. तेंव्हापासून जवळपास 22-23 महिने बालसुधारगृहामध्ये ठेवलेल्या बिलालला बालसुधार गृहाच्या न्यायाधिकरणाने सप्टेंबर 2018 मध्येच दोषमुक्‍त केले होते. केंद्र सरकारच्या आदेशाद्वारे अलिकडेच त्याची सुटका करण्याचे आदेश दिले गेले होते, असे होशियारपूरच्या उपायुक्‍त इशा कालिया यांनी सांगितले.

बिलालचे वडील मोहम्मद अकबर हे रोजंदारी करणारे मजूर आहेत. बिलालच्या सुटकेसाठी त्यांनी पाकिस्तानी प्रसार माध्यमांमध्ये आवाहन केले होते. वेगवेगळ्या संस्था, संघटनांनी बिलालच्या सुटकेसाठी मोठे अभियान उभे केले होते.
पाकिस्तानी उच्चायुक्‍तालयाने दिलेल्या आपत्कालिन प्रवासी प्रमाणपत्राच्या आधारे बिलालला पाकिस्तानच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्याला घरी परत जाता आले, त्याबद्दल बिलालने आनंद व्यक्‍त केला आहे. चांगली वागणूक दिल्याबद्दल त्याने भारतीय अधिकाऱ्यांचे आभारही मानले आहेत. त्याच्या घरी आई, भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. आपल्याला व्हिसा मिळाला तर पुन्हा भारतात यायला आवडेल, असेही त्याने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.