भोपाळ : देशात करोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. मात्र असे असले तरी देशावर तिसऱ्या लाटेचे सावट घोंगावत आहे. त्यामुळे या धोक्याच्या अगोदरच प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. त्यासाठी देशाचे लसीकरणावर भर देण्यात येत आहे.
तर दुसरी कडे करोना बाधित रुग्ण या आजाराशी लढत आहे. कोविड बाधित कित्येक रुग्णांना ऑक्सिजन व्हेंटिलेटरची गरज पडते आहे तर कित्येकांच्या या आजारामुळे फुफ्फुसावर परिमाण होत आहे. यातच मध्य प्रदेशच्या इंदोरमधील 12 वर्षांची सिमी दत्त आधीपासूनच एका फुफ्फुसावर जीवन जगण्यासाठी लढत आहे. त्यात कोविड बाधा झाल्यामुळे तिला गंभीर परिमाणांचा सामना करावा लागला. मात्र याला सिमीने एका फुफ्फुसासह लढा दिला आणि त्यावर तिने मातही केली आहे.
तिच्या वडिलांनी याबाबत माध्यमांशी बोलतांना सांगितले की,’सिमीला कोविड झाला तेव्हा तिचे ऑक्सिजन 40-50 पर्यंत कमी झाले. यापूर्वी एका फुफ्फुसामुळे तिच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 60-65 वर पोहोचत असे. झोपताना तिच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात राहावी यासाठी तिला रात्री ऑक्सिजनची गरज पडायची. मात्र बाधित झाल्यानंतर ऑक्सिजन पातळी त्यापेक्षाही कमी झाली. डॉक्टरांच्या सल्लानुसार तिला घरीच बाइपेप आणि ऑक्सिजन लावण्यात आलं. या गंभीर परिस्थिती माझ्या मुलीने हार मानली नाही. अखेर करोनाशी तिने लढा जिंकला.’