ढाका – बांगलादेशात भगवान विष्णूची एक हजार वर्षांपूर्वीची पुरातन मूर्ती सापडली आहे. एका शिक्षकाकडून पोलिसांनी ही मूर्ती ताब्यात घेतली आहे. असे वृत्त स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी दिले आहे. क्युमिलीया जिल्ह्यातल्या बोरो गोली गावात ही मूर्ती सापडली आहे. संपूर्ण काळ्या पाषाणातील या मूर्तीची उंची 23 इंच आहे. तर रुंदी 9.5 इंच आहे. या मूर्तीचे वजन 12 किलो आहे.
ही मूर्ती अबू युसूफ नावाच्या शिक्षकाला 15 दिवसांपूर्वी सापडली होती. मात्र या शिक्षकाने त्याबद्दल कळवलेले नव्हते. या मूर्तीबाबत पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे समजले होते. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री या शिक्षकाच्या घरी जाऊन ही मूर्ती ताब्यात घेतली, असे दौडकांडी पोलीस ठाण्याचे प्रभारी नझरुल इस्लाम यांनी सांगितले.
मात्र आपण या मूर्तीबाबत 20-22 दिवसांपूर्वीच कळवले होते, असे युसुफ यांनी म्हटले आहे. ही मूर्ती एका तळ्यासाठीचे खोदकाम करताना आपल्याला मिळाली होती. त्यावेळी आपण कामामध्ये व्यस्त असल्याने या मूर्तीबाबत कळवता येऊ शकले नव्हते, असे त्यांनी म्हटले आहे.
सापडलेली ही विष्णूची मूर्ती खूपच मौल्यवान आहे. ही मूर्ती किमान 1 हजार वर्षांपूर्वीची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही मूर्ती ताबडतोब मैनामती संग्रहालयाकडे हस्तांतरित व्हायला पाहिजे, तेथेच ही मूर्ती अधिक चांगल्या प्रकारे जतन केली जाऊ शकते. असे चॅटोग्राम विभागीय पुरातत्व विभागाचे माजी प्रादेशिक संचालक अताउर रहमान यांनी सांगितले.