सोमाटणे, (वार्ताहर) – शिरगाव येथील भर लोकवस्तीत आढळून आलेल्या अजगर जातीच्या सापाला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे.
शिरगाव येथील सूरज भोसले यांना वस्तीत साप असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ ही माहिती वन्यजीव रक्षक मावळचे संतोष गोपाळे यांना दिली.
संतोष गोपाळे यांनी संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना याबाबत कळविले आणि सुरक्षितरित्या अजगराला रेस्कू केले.
त्यानंतर जिगर सोलंकी, निनाद काकडे, सर्जश पाटील यांनी अजगराची तपासणी केली. एकूण दहा फूट लांबीचा हा अजगर स्वस्थ असल्याची माहिती वनपाल एम. हिरेमठ यांना देण्यात आली आणि नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
यावेळी सर्पमित्रांनी अजगर आणि इतर सापांबद्दल स्थानिकांमध्ये प्रबोधन केले. कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास प्राणीमित्राला किंवा वनविभागाला संपर्क (१९२६) करावा, असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळचे संस्थापक निलेश गराडे व अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे.
कोट
इंडियन रॉक पायथन (भारतीय अजगर) हा बिनविषारी जातीचा साप आहे. हा साप साधारण १५-१७ फुटापर्यंत वाढू शकतो. जंगलातील लहान लहान प्राणी जसे की ससे, भेकर, घूस हे त्याचे खाद्य आहे.
मावळात आतापर्यंत १५ फुट लांबाचा अजगर आढळून आला आहे. वनविभाग आणि सर्पमित्रांकडून सापांना सुरक्षितरित्या पकडून जंगलात सोडले जाते. – रौनक खरे, प्राणी अभ्यासक