नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. त्यावेळी रिझर्व्ह बॅंक व्याजदरात 0.50% ची वाढ करण्याची शक्यता विश्लेषकांना वाटते. करोना आणि रशिया व युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर महागाईचा भडका उडाला आहे. महागाई कमी करण्यासाठी अमेरिकेची रिझर्व्ह बॅंक फेडरल रिझर्व्हने पुन्हा व्याजदरात 0.75 टक्क्यांची वाढ करून आता व्याजदर सव्वातीन टक्क्यापर्यंत नेला आहे.
युरोप, ब्रिटन, जपान या आठवड्यात व्याजदर वाढ करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारतीय रिझर्व्ह बॅंक 30 सप्टेंबर रोजी पतधोरण जाहीर करणार आहे.
या अगोदर रिझर्व्ह बॅंकेने तीन टप्प्यात व्याजदरात 1.40 टक्क्यांची वाढ केली आहे. यात आणखी 0.50 टक्क्यांची भर पडेल. आयसीआयसीआय सिक्युरिटीज या संस्थेच्या टिपणात म्हटले आहे की, रिझर्व्ह बॅंक डिसेंबरमध्ये पुन्हा व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ करून व्याजदर 6.15 टक्क्यापर्यंत जाईल.
त्यानंतर नोव्हेंबर 2022 पर्यंत महागाई कमी होऊन 6 टक्के होण्याची शक्यता आहे. दरम्यान रशिया- युक्रेन युद्ध चिघळले किंवा चीन -तैवान तणाव वाढला तर परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि जागतिक पातळीवर महागाई वाढवून भारताला आयात महागात पडू शकते. यावर्षी भारताचे अन्नधान्य उत्पादन कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत महागाई जास्त वाढू नये याकरिता रिझर्व्ह बॅंकेला व्याजदरात वाढ करीत राहावे लागेल असे काही विश्लेषकांनी सांगितले.