राजगुरूनगर – जिल्ह्यात अग्रणी असलेल्या राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी विजया रामदास शिंदे यांची एकमताने निवड झाली आहे. बॅंकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात त्या दुसऱ्या महिला अध्यक्षा आहेत.
गणेश थिगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रभारी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष अरूण थिगळे यांनी कारभार सांभाळला होता. अध्यक्षपद रिक्त झाल्यानंतर मंगळवारी (दि. 8) राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्याअध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक श्रीकांत श्रीखंडे, सहाय्यक अधिकारी जे. बी. मुलाणी यांनी काम पहिले.
अध्यक्षपदासाठी विजया शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी बॅंकेचे उपाध्यक्ष अरुण थिगळे, ज्येष्ठ संचालक प्रताप आहेर, किरण आहेर, किरण मांजरे, राजेंद्र वाळुंज, ऍड. मुकुंद आवटे, गणेश थिगळे, ऍड. डी. के. गोरे, सतीश नाईकरे, दिनेश ओसवाल, राहुल तांबे, हेमलता टाकळकर, परेश खांगटे, धनंजय कहाणे, यांच्यासह बॅंकेचे सरव्यवस्थापक शांताराम वाकचौरे, उपव्यवस्थापक संजय ससाणे उपस्थित होते.
राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या इतिहासात 2000मध्ये मंगल पारख या बॅंकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या होत्या, त्यानंतर तब्बल 20 वर्षानंतर आता पुन्हा विजया शिंदे या महिला संचालकाला अध्यक्षपदी संधी मिळाली आहे. नवनिर्वाचित अध्यक्षा विजया शिंदे यांचा शिवसेनेच्यावतीने जिल्हा समन्व्यक ऍड. गणेश सांडभोर, उद्योजक राहुल जायभाय, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, शहर प्रमुख दिलीप तापकीर, नवनाथ कोतवाल आदींनी सत्कार केला. राजगुरूनगर सहकारी बॅंक जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रणी बॅंक म्हणून नावारूपाला आली आहे. नोट बंदीच्या काळात बॅंकेने त्यांच्या सभासद आणि ग्राहकाला उत्तम सेवा दिली. त्यामुळे या बॅंकेचे सहकार क्षेत्रात नावलौकिक उंचावला आहे.
- ‘बॅंकेच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवणार’
बॅंकेच्या प्रगतीसाठी सर्व संचालक प्रयत्न करीत आहेत हा प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व संचालकांना बरोबर घेऊन ग्राहक हितासह बॅंकेच्या हिताचे निर्णय घेतले जातील. गेली 30 वर्षे शिवसेनेत असल्याने माझा स्वभाव कडक बनला आहे. आवाज मोठा आहे. प्रतिकार करण्याची शक्ती जास्त आहे. शब्दाला धार आहे. मात्र त्याचा कधी गैरवापर केला नाही. संचालकांनी दिलेल्या अध्यक्षपदाच्या संधीचे सोने केले जाईल. सभासद आणि ग्राहकांच्या हिताचे जास्तीत जास्त निर्णय घेतले जातील, असे सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित अध्यक्ष विजया शिंदे यांनी नमूद केले.
गेली अनेक वर्षे शिवसेनेत राहून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम विजया शिंदे यांनी केले आहे. बॅंकेच्या संचालक असताना बॅंकेच्या सभासद व ग्राहकांचे हित जोपासले. त्यांना आता अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. आगामी काळात बॅंकेच्या सभासद व ग्राहकांच्या हिताचे निर्णय त्या नक्की घेतील.
– ऍड. गणेश सांडभोर, समन्वयक, शिवसेना, पुणे जिल्हा