शिक्रापूर -शिक्रापूरसह परिसरात दररोज विविध ठिकाणी करोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच भर म्हणजे बुधवारी (दि. 5) पुन्हा शिक्रापुरमध्ये 3, विठ्ठलवाडीत 2, धानोरेत 1 तर कोंढापुरीत 1असे एकूण 7 बाधित आढळले आहेत.
शिक्रापूरसह विविध ठिकाणी राहणारे 3 कंपनी कामगार करोना बाधित झाल्याचे समोर आले आहे. येथील सर्व कंपनी कामगारांनी कंपनीच्या वतीने तपासणी केली असता त्यांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तर विठ्ठलवाडी येथे 2 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. धानोरे व कोंढापुरी येथे प्रत्येकी 1 करोना रुग्ण आढळले आहेत. धानोरे येथे एका करोना बाधित इसमाचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एक रुग्ण आढळला आहे. कोंढापुरी येथील एका कंपनीने खबरदारी म्हणून कामगारांची तपासणी केली असता काही कामगारांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामध्ये कोंढापुरी येथील 1, विठ्ठलवाडी येथील 2 कामगार आढळले आहेत. परिसरात आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे व आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, आरोग्य सेविका जनाबाई शिरसाठ, कोंढापुरी येथील आरोग्य सेविका अनिता भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून औषध फवारणी करत परिसर निर्जंतुकीकरण केला आहे. शिक्रापूर येथील तिघांच्या संपर्कातील दहा, कोंढापुरी येथील चार, तर विठ्ठलवाडी व धानोरे येथील दोघांच्या संपर्कातील सात जणांना होम क्वारंटाइन केले आहे.