वाघोली -येथील भावडी रस्त्यावरील पूर्वरंग सोसायटीच्या शेजारी असलेले महावितरण कार्यालयाचे सोमवारी (दि. 27) बकोरी रस्त्यावरील न्याती सोसायटीसमोर स्थलांतर करण्यात आले आहे. यामुळे भावडी रस्त्यावरील कार्यालयातील जागेची कमतरता व पावसाळ्यात होणाऱ्या अडचणींमुळे महावितरणचे कर्मचारी, अधिकाऱ्यांची सुटका झाली आहे.
वाघोलीतील वाढते नागरिकीकरण आणि ग्राहक संख्या 60 हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे या ठिकाणी कामगार व अधिकाऱ्यांना जागा अपुरी पडत होती. पावसाळ्यात कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने कर्मचाऱ्यांसह नागरिकांना देखील अडचणी येत होत्या. यापूर्वी दोन वेळा महावितरणचे कार्यालय बकोरी रस्त्याला स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ग्रामस्थांनी विरोध केल्याने पुन्हा भावडी रस्त्याला सुरू राहिले होते. अखेर नुकतेच त्याचे स्थलांतर करण्यात आले आहे.
-मागील दोन वर्षांपासून वाघोलीतील महावितरणचे उपविभागीय कार्यालय स्थलांतर करण्याचा प्रस्ताव महावितरणच्या दरबारी पडून आहे. तरी हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून तातडीने प्रयत्न करीत आहोत.
– राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच, वाघोली