लडाख: भारतीय लष्कराच्या ध्रुव या ऍडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टरने आज पूर्व लडाखमध्ये खबरदारी म्हणून इमर्जन्सी लॅन्डींग केले. लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिली. या हेलिकॉप्टरमधील सर्व कर्मचारी आणि प्रवासी सुखरूप आहेत, असेही लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.
हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याची शंका वैमानिकाला आली. त्यामुळे हेलिकॉप्टर खबरदारीचा उपाय म्हणून उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील अधिक माहिती मिळवणे सुरू आहे.
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्यामध्ये उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. दोन्ही सैन्याच्या सैनिकांमध्ये 15 जूनला झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते.