सातारा – जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या ६९० झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा शहरातील खासगी रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोल्हापूर येथील 39 वर्षीय पुरुषाचा अहवाल करोनाबाधित आल्याचे खासगी प्रयोगशाळेने कळविले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात कोरेगाव तालुक्यातील गिघेवाडी येथील ७८ वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याला उच्च रक्तदाब व श्वसन संस्थेचा त्रास होता.दोन बाधित स्त्रियांची प्रसुती; बाळं लक्षणे विरहीतक्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणाऱ्या जावळी तालुक्यातील गवडी येथील करोनाबाधित २६ वर्षीय महिलेची प्रसुती ३० मे रोजी झाली असून बाळ व आई सुखरुप असून बाळाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज तिला डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणाऱ्या माण तालुक्यातील बनवडी येथील करोनाबाधित २५ वर्षीय महिलेची १० जून रोजी सकाळी सुरक्षित प्रसुती झाली. बाळ व आई सुखरुप असून बाळ लक्षणे विरहीत आहे. डॉ. सुनिल एम. सोनवणे, स्त्री रोग तज्ञ वर्ग-1 व विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत.