पॅरिस – करोना फैलावामुळे जगभरात उद्भवलेल्या संकटाच्या काळात मोठा दिलासा देणारी बातमी आहे. जगभरात करोनामुक्त झालेल्या बाधितांची संख्या गुरूवारी 20 लाखांवर पोहचली.
करोना संसर्गाच्या जागतिक साथीने जगभरात कहर केला आहे. आतापर्यंत जगभरात 51 लाखांहून अधिक करोनाबाधित आढळले आहेत. त्यातील 3 लाख 30 हजारांहून अधिक बाधित मृत्युमुखी पडले आहेत.
संपूर्ण जगाला करोनाने वेठीस धरल्याचे चित्र असतानाच बऱ्या झालेल्या रूग्णांची संख्या संकटावर मात करण्याची आशा आणखी पल्लवित करणारी आहे. करोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे जागतिक प्रमाण सुमारे 40 टक्के इतके आहे. करोनाचा उद्रेक सर्वप्रथम चीनमध्ये झाला. आता चीनसह विविध देशांत करोनाचा फैलाव नियंत्रणात आल्याचे संकेत मिळत आहेत.
करोनाने सर्वांधिक तडाखा अमेरिकेला दिला. त्या देशात सुमारे 16 लाख करोनाबाधित आढळले आहेत. अमेरिकेत करोनाने 95 हजारांहून अधिक बाधितांचा बळी घेतला आहे. ब्रिटन आणि इटलीत अनुक्रमे 36 हजार आणि 32 हजार बाधित मृत्युमुखी पडले. फ्रान्स आणि स्पेनमध्ये प्रत्येकी 28 हजारांच्या आसपास बाधित दगावले आहेत.
अमेरिकेखालोखाल रशियात 3 लाखांहून अधिक रूग्णांना करोनाची बाधा झाली आहे. ब्राझील, स्पेन आणि ब्रिटनने बाधितांच्या संख्येत अडीच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. करोना संकटाशी संपूर्ण जग लढा देत आहे. करोना फैलाव रोखण्याबरोबरच त्या विषाणूच्या विरोधातील लस किंवा औषध बनवण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.