नारायणगाव -परप्रांतीय नागरिकांना मंचर येथे सोडण्यास नकार देणाऱ्या ट्रक चालकाला नारायणगाव पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने काठीने बेदम मारहाण केल्याने ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. यात त्याच्या उजव्या हाताचे बोट फॅक्चर झाले आहे. ही घटना कांदळी येथे (दि. 6) मध्यरात्री घडली.
दिनेश चंद्रकांत जगताप (वय 36, रा. कोल्हे मळा, नारायणगाव, ता. जुन्नर), असे पोलीस अधिकाऱ्याच्या मारहाणीत जखमी झालेल्या ट्रक चालकांचे नाव आहे. नारायणगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, असे मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. दिनेश हा (दि. 5) कांदळी येथील औद्योगिक वसाहतींमधून कोंबडी खत घेऊन संगमनेरला देऊन पुन्हा संगमनेरहून कांदळी दिशेला रात्री 1 वाजता येत होता.
त्यांच्या मालवाहतूक ट्रकला नारायणगाव पोलिसांनी कांदळीत थांबवून मध्यप्रदेशमधील 70 नागरिकांना मंचर याठिकाणी सोड, अशी मागणी पवार यांनी केली. जगताप यांनी ही माल वाहतूक गाडी आहे. ही गाडी कांदळीत पार्किंग करून नारायणगावला जायचे आहे, मला पुन्हा सकाळी गाडी घेऊन जायचे आहे, असे सांगून या मागणीस विरोध दर्शविला. त्या अधिकाऱ्याने चालकास मारहाण केली.
एका पोलीस कर्मचाऱ्याने ट्रकचालकाला त्याचा हात फॅक्चर असतानाही गाडी नारायणगाव पोलीस स्टेशनला आणली. दरम्यान, खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. याचा अर्थ त्यांनी कुणालाही मारहाण करणे हे योग्य नाही. ते खपवून सुद्धा घेतले जाणार नाही. यासंदर्भात या अधिकाऱ्यांना योग्य ती समज द्यावी, अशी सूचना कोल्हे यांनी दिल्या आहेत.