- 14 दिवसांनंतरही शेकडो शाळा नोंदणीविनाच
- शिक्षणाधिकारी घेणार कार्यशाळा
पिंपरी – दुर्बल, वंचित तसेच दिव्यांग घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षणसंस्थेत 25 टक्के कोट्यातून मोफत प्रवेशाच्या प्रक्रियेसाठी खासगी शाळांच्या नोंदणीच्या प्रक्रियेला 21 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. शाळांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होऊन 14 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शाळांची नोंदणी करण्यात उदासीनता दिसत आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच शाळांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.
शाळांच्या उदासीनतेमुळे मागील वर्षा इतकीदेखील नोंदणी होईल की नाही, असा प्रश्न पालकांमध्ये व सुजाण नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे. शाळांच्या नोंदणीला आता आवघ्या तीन दिवसांचाच कालावधी उरला असल्यामुळे किती शाळांची नोंदणी होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. शिक्षण हक्क कायद्याने (राईट टू एज्युकेशन) मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दिव्यांग विद्यार्थ्यांना 25 टक्के मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शिक्षण संस्थांना घालून दिले आहे. उपरोक्त घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हा या मागचा मुख्य उद्देश आहे. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल, अशा शाळांच्या पहिल्या वर्गात 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. 2020-2021 या शैक्षणिक वर्षातील 25 टक्के मोफत शिक्षण प्रक्रियेला 21 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे.
यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवातीलाच खो बसल्याने पहिल्या टप्प्यामध्ये शाळांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यात येते आहे. मात्र, आतापर्यंत शहरातील बहुतांश शाळांनी शाळेची नोंदणी करण्याबाबत उदासीनता दाखवली आहे. आतापर्यंत हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्याच शाळांनी रजिस्ट्रेशन पूर्ण केले आहे. शाळा नोंदणी 6 फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहे. त्यामुळे आता आवघे दोन दिवस शिल्लक असतानाही शाळा प्रशासन नोंदणी करताना दिसत नाही. त्यामुळे पालकांमधून आश्चार्य व्यक्त होत आहे. मागील वर्षी पिंपरी-चिंचवड शहरातील 176 शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केली होती. त्यामुळे आता यावर्षी किती शाळांची नोंदणी होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रानंतरही शाळांचा प्रतिसाद नाही.
यावर्षीच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना आपले रजिस्ट्रेशन करण्यासंबंधी वारंवार सूचना केल्या आहेत. मात्र, शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काही दिवसांपूर्वी खासगी शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीसही काढली होती. परंतु शाळांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे, यावर्षी आरटीईसाठी शाळांची नोंदणी अत्यल्प झाली आहे.
11 फेब्रुवारीपासून अर्ज करता येणार
शाळांची नोंदणी प्रक्रिया 6 फेब्रुवारी रोजी पूर्ण झाल्यानंतर दि. 11 फेब्रुवारीपासून पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ही प्रक्रिया 29 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 11 व 12 मार्च या कालावधीत प्रवेशासाठीची पहिली सोडत काढण्यात येणार आहे.
एकच सोडतमुळे विद्यार्थी वंचित राहणार?
दरवर्षी शाळांतील रिक्त जागा भरेपर्यंत आरटीईसाठी लॉटरी काढली जात होती. यावर्षी एकाच वेळी लॉटरी काढण्यात येणार आहे. संबंधित शाळेत जेवढ्या जागा रिक्त आहेत त्या प्रमाणात प्रतीक्षा यादी राहणार आहे. मात्र, एकदाच सोडत काढली जाणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी या वेळी शाळांचा अल्पप्रतिसाद मिळाला आहे. शाळांना वारंवार सूचना देऊनही खासगी शाळांनी उदासीनता दाखवली आहे. आता शाळांच्या नोंदणीसाठी दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने आता शाळांचा सहभाग वाढविण्यासाठी खासगी शाळांची बुधवार, गुरुवार (दि. 5, 6) दोन दिवस कार्यशाळा अयोजित करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व खासगी शाळा या कार्यशाळेमध्ये सहभागी होणार असून, या कार्यशाळेतच सर्व शाळांची नोंदणी करून घेण्यात येणार आहे.
जोत्सना शिंदे, शिक्षणाधिकारी