नवी दिल्ली – अहमदनगर येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ. अमोल बागुल, मुंबई येथील अणु उर्जा केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक डॉ. ए. जेबीन जोएल आणि पुणे येथील विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. रजतपदक, मानपत्र आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्यसाधून देशातील शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते “राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2018-19’ने गौरविण्यात आले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक, राज्यमंत्री संजय धोत्रे आणि शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सचिव रिना रे यावेळी मंचावर उपस्थित होत्या.
पुणे येथील हडपसर परिसरातील विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी यांनी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना सर्वांगिण शिक्षण देण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मुल्याधारीत शिक्षणावर भर देवून विद्यार्थ्यांना संवेदनशील, वक्तशीर व जबाबदार बनविण्याकरिता त्यांनी शैक्षणिक उपक्रम राबविले व त्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग घडवून आणला. राधिका दळवी यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेवून त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.