राजा हरि सिंग यांची नातसून आहे ज्योतिरादित्यांची भगिनी
पुणे: केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने जम्मू-काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे कलम 370 आणि कलम 35 ए रद्द करुन एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयावर लोकसभेसह राज्यसभेत मतदान झाले. या मतदानात कॉंग्रेसचे संसद सदस्य ज्योतिरादित्य शिंदे यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याबद्दल अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
मात्र, त्याविषयी श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठानने समाज माध्यमांमध्ये याविषयी माहिती दिली असून त्यानुसार जम्मू-काश्मीर आणि ग्वाल्हेरकर शिंदे राजघराणे यांच्यात एक ऐतिहासिक संबंध असल्याचे स्पष्ट होत आहे. भारतातील काही मोजक्या लोकांनाच या ऐतिहासिक राजघराण्यांबद्दल माहीती आहे. कलम 370 हटवल्याचे समर्थन केल्याबद्दल महाराजा ज्योतिरादित्य शिंदे सरकार यांचे प्रतिष्ठानने अभिनंदन केले आहे.
जम्मू काश्मीरचे राजे हरी सिंग यांचे नातू (डॉ. कर्ण सिंग यांचे चिरंजीव) विक्रमादित्य सिंग यांच्याशी ग्वाल्हेरचे राजे माधवराव शिंदे यांच्या राजकन्या आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भगिनी चित्रांगदाराजे यांचा विवाह झाला आहे. या दोन्ही शाही घराण्यांना मोठा ऐतिहासिक वारसा असून या दोन्ही घराण्याचे संबंध नेपाळ-पटियाला आणि हिमाचल प्रदेशच्या राजघराण्यांशी जोडले गेले आहेत.
मूळचे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील कोरेगावजवळील कण्हेरखेड येथील शिंदे सरकार घराणे उत्तर भारतात प्रस्थापित झाल्यानंतर या घराण्याचे भारतातील अनेक प्रमुख राजघराण्याशी सोयर संबंध झाले आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश पाठोपाठ जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा आणि आता पंजाब राज्यातील पटियाला राज्याच्या राजघराण्याशी संबंध असणारे हे एकमेव मराठा राजघराणे आहे.
ज्योतीरादित्य शिंदे यांची भाची (बहिणीची मुलगी) मृगांकाराजे यांचा विवाह पंजाब राज्यातील पटियाला राजघराण्याच्या कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे नातू निर्वाण सिंह यांच्याशी झाला आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची कन्या अपराजिता ही पटियाला घराण्याची मोठी सून आहे. तसेच मध्य प्रदेशमधील सिंगरौली राजघराण्यातील ऐश्वर्य सिंह हे ज्योतिरादित्य यांचे आते जावई आहेत; तर नेपाळचे राजे पशुपती समशेर जंगबहाद्दूर आणि त्रिपुराचे महाराज कृती देव हे ग्वाल्हेर राजघराण्याचे जावई आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य शिंदे यांनी ठरावाच्या बाजूने मतदान का केले, याविषयीच्या चर्चेवर पुरेसा प्रकाश पडला आहे.