पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – मोठ्या आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर तक्रारी वाढल्यानंतर पुणे पोलीस जागे झाले असून, सर्वाधिक वाहतूक कोंडी होणारे बारा चौक पोलिसांनी शोधले आहेत. येथील वाहतूक कशी सुरळीत होईल, यावर पुणे पोलिसांना महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मदत करत आहेत.
अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बेसिक पोलिसिंगसह वाहतूक समस्या सोडविणे ही प्राथमिकता असल्याचे सांगितले होते. त्यानुसार कोंडी होणारे बारा चौक वाहतूक पोलिसांनी निश्चित केले आहेत. या चौकांमधून एकूण किती वाहने जातात. सकाळी, दुपारी आणि सायंकाळी नेमकी किती वाहने हे कुठल्या दिशेला जातात, याचा अभ्यास सुरू आहे. सिग्नलच्या वेळेत बदल, चौकातील साइड मार्जिन मोठ्या करणे, खड्डे बुजविणे यासारखे पायाभूत बदल करण्यात येत आहेत. सिग्नल परिसरातील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. वाहतूक सुरळीत होण्यासाठी या चौकांमध्ये काय करावे लागेल, याचा अभ्यास दोन ते तीन दिवसांत होईल, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.
पायाभूत सुविधांसंदर्भात महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घेण्यात येईल. खडकी येथील साई चौक आणि शास्त्री चौकात रस्ता मोठा केला आहे. तसेच साइड मार्जिन बरोबर आखून घेतली आहे. तसेच अॅम्युनेशन फॅक्टरीकडे आणि मुळा रस्त्याकडे जाणारी डावी बाजू वाहनांसाठी मोकळी केली. यामुळे या दोन्ही चौकांत वाहतूक कोंडी कमी झाल्याचे बोराटे यांनी सांगितले.
नगर रस्ता हा वाघोलीतील वाघेश्वर मंदिरापर्यंत ६ लेनचा आहे. पुढे वाघोली चौकात हा रस्ता चार लेनचा होतो. येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याची रुंदी वाढविण्याच्या सूचना दिली आहे. तर, पुणे विद्यापीठ चौकात मेट्रोचे काम सुरू असून, त्यासाठी जागा व्यापली गेली आहे. मुख्य खांब बांधण्याचे काम सुरू आहे. यामुळे येथील कोंडी सोडवण्यासाठी अभ्यास करत आहोत. – शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त, वाहतूक
रस्त्यांवरील अडथळ्यांची डोकेदुखी
अनेक महत्वाच्या चौकांत खड्डे पडले आहेत. ड्रेनेच्या कड्या तुटलेल्या आहेत किंवा झाकणे गायब आहेत. यामुळे चौकात येऊन वाहने हळू होतात आणि वाहतूक कोंडी होते. हे खड्डे बुजवणे आणि ड्रेनेजची झाकणे बरोबर करावी लागणार आहेत. याबाबत पालिकेला सूचवले आहे. तर, कर्वे रस्त्यावरील अनेक चौकांतील खड्डे बुजवण्यात आलेत. कात्रज ते कोंढवा रस्त्यावरील खडी मशीन चौकातील रस्ते हा लहान असून, तेथील स्पीडब्रेकर काढण्याची विनंती महापालिकेला केली जाणार आहे.
वाहतूक कोंडी होणारे प्रमुख परिसर
कात्रज चौक, खडी मशीन चौक, येरवडा आणि खडकी येथील शास्त्री चौक, वाघोली येथील मुख्य रस्त्यांवरील दोन चौक, ब्रेमेन चौक, साई चौक (खडकी) पुणे विद्यापीठ चौक, शिमला ऑफिस चौक, आरटीओ चौक आणि नवले पूल