संगमनेर – समाजप्रबोधपकार हभप निवृत्ती महाराज देशमुख यांच्या प्रकरणाची मंगळवारी (दि. 21) न्यायालयात सुनावणी होती. यावर दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. यावेळीही हभप देशमुख गैरहजर राहिल्याने न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. पुढील सुनावणी 24 नोव्हेंबरला होणार आहे.
पुत्रप्राप्तीबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याचा आरोप करीत संगमनेरच्या न्यायालयात तक्रार केली होती. महाराजांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाने संगमनेर कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत त्यांना दिलासा दिला होता.
यावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकारच्यावतीने औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
तेथे कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवण्यात आला. त्यावर इंदुरीकर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने सुनावणी करताना औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे संगमनेर येथील प्रथमवर्ग न्यायालयात इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात खटला पुढे चालू ठेवण्यात आला.
मागील तारखेच्या वेळी इंदोरीकर हजर झालेच नाही. त्यावेळी जामिनासाठी वकिलामार्फत अर्ज दाखल करण्यात आला होता. यावेळी मंगळवारी (दि 21 ) त्यांच्या जामिनावर दोन्ही पक्षकारांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांकडून इंदोरीकर महाराज यांना हजर करण्याची विनंती कोर्टाकडे करण्यात आली. पुढील सुनावणी 24 ला होणार आहे.