अमोल मतकर
संगमनेर –संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील उपकारागृहाची क्षमता अवघी 24 कैद्यांची असताना, सध्या तेथे क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे सुमारे 70 च्या आसपास कैदी आहेत. क्षमतेच्या तिप्पट कैदी सांभाळताना बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कैद्यांकडून बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनाच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार घडत असून कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम कैदी करतात.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कार्यालयाशेजारी चार बराक असलेले उपकारागृह आहे. त्यातील तीन पुरुष तर एक महिला कैद्यांसाठी राखीव आहे. उपलब्ध माहितीनुसार सध्या या कारागृहात न्यायालयीन कोठडीतील 59 पुरुष तर तीन महिला कैदी आहेत. तर पोलीस कोठडी सुनावलेले पाच कैदी आहेत. तर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडे संरक्षणाची जबाबदारी असते. कोपरगाव येथील उपकारागृहाची दुरुस्ती सुरु असल्याने, त्यातील कैदी इतरत्र पाठवण्यात आले असून, त्यातील सुमारे 14 कैदी संगमनेरातील सबजेलमध्ये पाठवण्यात आले आहेत. त्यात शिर्डीतील खुन प्रकरणातील आरोपींचाही समावेश आहे.
तुरुंगवास, प्रशासन, न्यायव्यवस्था व त्यातील त्रुटींची माहिती असलेले निर्ढावलेले कैदी पहाऱ्यावरील पोलीस कर्मचारी व प्रशासनाला जुमानत नाहीत. त्यामुळे त्यांचा आपसात राडा, शिवीगाळी, मारहाण व पोलिसांना धमकावण्याचे प्रकारही सुरु असतात. प्रसंगी अन्नत्याग करण्याची भुमिकाही ते घेत असल्याने वाढलेली कैद्यांची संख्या पोलिस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. या शिवाय कैद्यांना भेटण्यासाठी येणारे आगंतुक व पोलीस गार्डचा हलगर्जीपणा याचाही प्रत्यय वारंवार येत असल्याचे दिसते.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी तीन कैद्यांमध्ये वाद झाला त्यात नाहक एका पोलीस कर्मचाऱ्याला नाहक त्रास सहन करावा लागला. दिवसेंदिवस गुन्हे वाढ असताना रोज वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपी येत असतात. परंतु कारागृहात क्षमताच नसल्याने कैद्यांची संख्या वाढत चालली आहे.
कोपरगाव उपकारागृहातुन आलेले कैद्यांनी स्थानिक संगमनेर उपकारागृहाची शिस्त बिघडवली. वेळोवेळो जेलर म्हणून आम्ही त्या कैद्यांना समज देतो, परंतु ते कुणाचेच ऐकत नाही. उलट कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचे काम कैदी करत असतात आणि कर्मचाऱ्यांना वेठीस धरतात.
भाऊसाहेब बलसाने, तुरुंग अधिकारी, संगमनेर उपकारागृह