पुणे -वाढत्या उन्हामुळे पुणेकरांना उष्माघातापासून असलेल्या धोक्याबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेकडून पहिल्यांदाच सोशल मीडियावर “मिम्स’चा वापर करण्यात आला आहे. मात्र, हे मिम्स पुणेकरांच्या भेदक टोमण्यांमधूनही सुटू शकले नाहीत. महापालिकेने हे मिम्सचे उद्योग सोडून… पावसाळा तोंडावर आला असल्याने शहरातील खड्डे, अतिक्रमने, वाहतूक सुधारणा आणि मिम्सच्या शुद्धलेखन आणि भाषेकडे लक्ष द्यावे अशा सल्लयांचा पाऊस पुणेकरांनी महापालिकेच्या मिम्सवर पाडला आहे.
महापालिकेकडून गेल्या काही वर्षांत पालिकेच्या कामकाजाची माहिती तसेच जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर वाढविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे पुणेकरांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी, तसेच उष्माघाताचा धोका टाळावा यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश देणारे चार मिम्स पालिकेच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहेत. त्यात, मराठी चित्रपटांसह, हिंदी चित्रपटात गाजलेल्या काही संवादाचा वापर करण्यात आलेला असून, मराठीतील “नाळ’ चित्रपटातील “हे मला सैन नाही होत..’ तर अशी ही बनवाबनवी चित्रपटातील “फार उपकार होतील हो तुमचे..’ असे संवाद वापरण्यात आले आहेत.
पुणेकरांचे टोमणे
एकीकडे टेकडी फोडता… नदीकाठची हजारो झाडे तोडता आणि उष्माघाताचे मिम्स करता अशी अक्कल येते तरी कुठून?
असे फोटो एडिट करण्यापेक्षा आधी पावसाळापूर्व कामे पूर्ण करा.
आधी खड्डे आणि रस्ते दुरुस्तीची बनवाबनवी थांबवा.
पुणेकर कधीपासून मले-तुले करायला लागले सरळ मराठीत लिहा.
तुम्ही तुमची कामे नीट करा.. पुणेकरांना या अपेक्षा नाहीत तुमच्याकडून.
अशा कामांसाठी आम्ही कर भरतो का? आधी लोकांच्या समस्या बघा.
शहरात खड्डे, रस्ते, ड्रेनेज, पाणी समस्या आहेत, त्या सोडवा.. मिम्स काय टाकत बसलेत.