पिंपरी -संपूर्ण विश्वाला प्रेरणा देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात आणि शिवरायांच्या जयघोषात पार पडले. हातात भगवे झेंडे घेऊन, जय शिवराय असा जयघोष करत विविध ठिकाणी रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी पोवाडे गायन, महानाट्याचे सादरीकरण झाले. निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्प समूह परिसर शिवप्रेमींच्या गर्दीने फुलुन गेला होता. यावेळी करण्यात आलेल्या जयघोषणाने परिसर दुमदुमला.
शिवजयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने शहरभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाल्हेकरवाडी, निगडी, दापोडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, सांगवी, काळेवाडी परिसरात दुचाकी रॅली काढण्यात आली. हातात भगवे झेंडे घेऊन तरुण मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभागी झाले होते. वाल्हेकरवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या कार्यक्रमात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजयंती उत्सवानिमित्त काळेवाडी येथील आझाद मित्र मंडळ स्पोर्ट क्लबने गणेश मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी छत्रपतींच्या मुर्तीचे पूजन करून परिसरातून रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाचे काळूराम नढे यांनी केले. रावेत येथील ज्येष्ठ नागरिक संघामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. तर, किवळे येथे ऍड. विनय दाभाडे लिखीत, निर्मित शिवसह्याद्री या माहानाट्याचे सादरीकरण झाले. कार्यक्रमास नागरिकांनी मोठी गर्दी केली होता.
रिपब्लिकन जनशक्ती पक्ष आणि आदिवासी पारधी समाज सुरक्षा दलाच्या वतीने निगडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी पक्षाचे युवक अध्यक्षक किसन भोसले यांनी मार्गदर्शन केले. महिला आघाडीच्या तिफन्ना काळे, दीपाली भोसले, कुसुम कदम, अनिश भोसले, आदित्य काळे आदी उपस्थित होते.
भक्ती-शक्ती शिल्प समूह परिसरात शिवसागर
निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्प समूह परिसरात सकाळपासून शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज भेटीचे शिल्प समुहाला पुष्पहार अर्पण करून शिवरायांचा जयघोष करण्यात आला. यानंतर दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले. शिल्प समुहाला वंदन करण्यासाठी आलेल्या अबालवृद्धांमुळे परिसरातील वातावरण भगवेमय झाले होते. तसेच जमलेल्या शिवप्रेमींमुळे शिवसागर उसळल्याचे चित्र होते.