पुणे -प्रत्येक पुणेकराला समान पाणी देण्यासाठी समान पाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम गेल्या पाच वर्षात 60 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, या योजनेचे पाणी मिळण्यासाठी पूर्व पुण्यातील उपनगरांना चार वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
लष्कर जलकेंद्राअंतर्गत पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडिवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी भागांचा पाणीपुरवठा केला जातो. या भागांत काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर 2026 उजाडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तब्बल अडीच हजार कोटी रूपयांची ही योजना आहे. त्या अंतर्गत शहराचे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर असे चार भाग करण्यात आले आहेत. कामातील दिरंगाईवरून पूर्व भागाचे काम दिलेल्या कंपनी आणि महापालिकेत वाद निर्माण झाले होते. त्यानंतर कंपनी लवादात गेली. त्यात तब्बल अडीच वर्षे हे काम रखडले. वाद मिटल्यानंतर ही कंपनी पुन्हा काम करण्यास तयार झाली असून, एप्रिल 2022 मध्ये कंपनीस 48 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
पूर्व भागाच्या पाण्यासाठी हे आहे नियोजन
पूर्व भागाच्या समान पाणी पुरवठा योजनेसाठी 415 कोटी रुपये खर्च केला जाणार आहेत. याअंतर्गत 359 कि.मी. जलवाहिनीपैकी आता केवळ 42 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तर सुमारे 49 हजार 44 मीटर बसविण्यात येणार असून, सध्या एकही मीटर बसवलेले नाही. तर 21 टाक्या असून त्यातील अनेक टाक्यांची कामेही अर्धवट आहेत.