शिक्रापूर-शिक्रापूर (ता. शिरूर) येथील शेतकऱ्याच्या शेताचा रस्ता तहसीलदारांचे आदेश डावलून जेसीबीच्या सहाय्याने खोदून अडवल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शिक्रापूर सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय रावसाहेब मांढरे व बाळासाहेब मांढरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील नितीन खेडकर यांनी काही दिवसांपूर्वी दिलीप खेडकर यांची शेती विकत घेतलेली असून शेतीला चासकमान कालव्याचा जुना रस्ता आहे. हा रस्ता यापूर्वी दत्तात्रय मांढरे यांनी अडविला असल्याने नितीन खेडकर यांनी शिरूर तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार तहसीलदार यांनी हा रस्ता खुला करण्याच्या आदेश मंडलाधिकारी यांना दिलेले असताना त्यावेळी शिक्रापूर पोलिसांच्या बंदोबस्तात रस्ता खुला करण्यात आला.
मात्र, त्यानंतर दोनच दिवसांत पुन्हा दत्तात्रय मांढरे यांनी रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदून पुन्हा अडवला. त्यामुळे खेडकर यांनी पुन्हा तहसीलदार यांच्याकडे अर्ज केल्यानंतर तहसीलदार यांनी रस्त्याचा पंचनामा करण्याचे आदेश मंडलाधिकारी यांना दिले.
त्यानुसार मंडलाधिकारी यांनी रस्त्याचा पंचनामा करत तहसीलदार यांना सादर केला आहे. नितीन ज्ञानेश्वर खेडकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी शिक्रापूर सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय रावसाहेब मांढरे व बाळासाहेब मांढरे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.