तापसी पन्नूच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बाब आहे. तिच्या “ब्लर’चे शूटिंग आता संपले आहे. या सिनेमाद्वारे तापसीने निर्मितीच्या क्षेत्रातही पदार्पण केले आहे. गेल्या महिन्याभरापासून तापसी नैनितालमध्ये राहात होती. याकाळात तिने “ब्लर’चे शूटिंग संपवले आणि ती घरी परत आली आहे.
नैनितालमध्ये राहात असताना तिला तिथल्या सुगंधी मेणबत्त्यांबद्दल समजले. तिने ख्रिसमसच्या निमित्ताने आपल्या घरच्यांसाठी आणि मित्रमंडळींना भेट देण्यासाठी या सुगंधी मेणबत्त्या खरेदी केल्या आहेत. तापसीचे प्रॉडक्शन असलेल्या सायकोलॉजिकल थ्रिलर “ब्लर’चे डायरेक्शन अजय बहलने केले आहे. एक मुलगी काही अडचणीत सापडली आहे.
त्यानंतर तिच्या आयुष्यात काही अत्यंत रोमांचकारी घटना घडायला लागतात. त्या घटनांमधून ही मुलगी कशा रितीने बाहेर पडते त्याचे दर्शन “ब्लर’मध्ये बघायला मिळणार आहे. नैनितालमधील अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणात “ब्लर’चे शूटिंग झाले आहे.
तापसीने यापूर्वी “गेम ओव्हर’नावाचा असाच सायकोलॉजिकल थ्रिलर केला होता. मात्र, तो बॉक्स ऑफिसवर चालला नाही. आता तापसीचे एकापाठोपाठ एक अनेक सिनेमे येणार आहेत. मिताली राजचा बायोपिक “शाबास मितू’ व्यतिरिक्त “लूप लपेटा’ आणि “दो बारा’मध्ये तापसी लीड रोलमध्ये असणार आहे.