ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून– पुणे जिल्हा बॅंकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या अटकेच्या निषेधार्थ बुधवारी (दि.24) पुकारलेल्या मावळ बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. लोणावळ्यासह मावळातील विविध भागांतील नागरिकांनी दैनदिन व्यवहार बंद ठेवत, कडकडीत बंद पाळला तर देहूरोड, देहुगाव व अन्य भागात मात्र दैनंदिन व्यवहार सुरळीत असल्याचे चित्र होते. हा बंद शांततेत पार पडला असून, एकाही अप्रिय घटनेची नोंद झाली नाही.
लोणावळा शहरात गवळीवाडा नाका परिसर वगळता उत्तम प्रतिसाद मिळाला. लोणावळा शहराची मुख्य बाजारपेठ तसेच भांगरवाडी परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. मेडिकल, बेकरी व भाजीपाला यांची दुकाने वगळता बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. तर दुसरीकडे गवळीवाडा नाका व आजूबाजूच्या परिसरातील दुकाने मात्र खुली असल्याचे चित्र पहायला मिळत होते. नेवाळे यांना झालेली अटक ही राजकीय दबावातून झाली असून, सत्ताधारी पक्ष प्रशासनावर दबाव आणत भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला भाग पाडत असल्याचा आरोप भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे.तर ग्रामीण भागासह शहरी भागात तळेगाव दाभाडे, वडगाव, कामशेत, सोमाटणे तसेच प्रमुख बाजारपेठ असेलल्या कामशेतमध्ये दैनंदिन व्यवहार सुरू होते. मावळ बंदच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदकडे नागरिकांनी तसेच व्यावसायिकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू होते.
या वेळी महाविकासआघाडी सत्तेचा गैरवापर करत दडपशाही करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असून केवळ भाजपचे दुकान सुरू करण्यासाठी मावळ बंदची हाक दिली आहे असा आरोप केला व नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवावेत, असे आवाहन केले होते. कामशेत, तळेगाव दाभाडे, वडगाव, सोमाटणे या प्रमुख शहरांसह मावळ तालुक्यातील सर्वच गावांमध्ये दैनंदिन व्यवहार सुरू होते.