भाटघर : डिसेंबर महिना उजाडला तरीही भाटघर धरणात ९९ टक्के पाणीसाठा असून उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा भासणार नाही, अशी माहिती भाटघर धरण प्रशासनाच्या वतीने
देण्यात आली. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला तरीही भाटघर धरणामध्ये ९९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
भाटघर धरणाची पाणी साठवण क्षमता २३.७५ टीएमसी असून सद्यस्थितीला २३.५१ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे यावर्षी उन्हाळ्यात परिसरातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचे संकट राहणार नाही. तसेच पूर्व भागातील शेतीसाठी पाण्याचा तुटवडा भासणार नाही.
यावर्षी पर्जन्यमान काळात १३९९ मिलिमीटर पाऊस झाला. परतीच्या पावसानेही जोरदार हजेरी लावली होती. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने भाटघर परिसरातील भात पिके तरारली होती. परंतु भात पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भाताच्या उत्पादनात घट झाली.
गतवर्षी धरण २० सप्टेंबर यादिवशी भरले होते. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. पावसाचे प्रमाण कमी असल्याने गेल्या वर्षी उन्हाळ्यात लवकरच पाण्याचा तुटवडा भासला होता. यावेळी परिसरातील नागरिकांपुढे पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहिले होते. यामुळे भाटघर पुनर्वसन सेवा समितीला दोन वेळा आंदोलन करावे लागले होते. यावर्षी धरणातील पाण्याची स्थिती ठीक असल्याने उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा भासणार नसल्याचे भाटघर प्रशासनाने सांगितले.