नवी दिल्ली – कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी हे सर्वांत योग्य नेते आहेत. माझ्यासह 99.9 टक्के कॉंग्रेसजनांना अध्यक्षपदी राहुल हवे आहेत, असे त्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी शुक्रवारी म्हटले.
कॉंग्रेस अध्यक्षपदाची हंगामी सुत्रे सोनिया गांधी सध्या सांभाळत आहेत. त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठका बोलावल्या आहेत. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर, राहुल यांनी पुन्हा पक्षाध्यक्षपदाची धुरा हाती घ्यावी, अशी बहुतांश कॉंग्रेसजनांची अपेक्षा सुर्जेवाला यांनी बोलून दाखवली.
नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पक्ष लवकरच सुरू करेल, असेही त्यांनी सूचित केले. सोनियांनी बोलावलेल्या बैठकांच्या सत्रांमध्ये असंतुष्ट म्हणून उल्लेख होणारे पक्षाचे ज्येष्ठ नेतेही सहभागी होणार आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद दूर करण्यासाठी सोनिया सरसावल्याचे बोलले जात आहे.
मात्र, पक्षात कुठलीही नाराजी नाही. पक्ष एखाद्या कुटूंबाप्रमाणे एकजूट आहे, असा दावा सुर्जेवाला यांनी केला. काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनियांना एक पत्र पाठवले होते. त्यामधून पक्षात संघटनात्मक पातळीवर व्यापक फेरबदल करण्याची मागणी करण्यात आली होती. पत्र लिहिणाऱ्या त्या नेत्यांचा उल्लेख सातत्याने असंतुष्ट नेते म्हणून होत आहे.