पुणे जिल्ह्यातील 98 ग्रामपंचायती ‘करोना हॉटस्पॉट’

पुणे – ग्रामीण भागात दोन महिन्यांपासून करोनाचा संसर्ग फोफावला आहे. त्यामध्ये 98 ग्रामपंचायती करोनाच्या “हॉटस्पॉट’ बनल्या आहेत. तेथे पंधरापेक्षा अधिक बाधित सापडले आहेत. यात सर्वाधिक गावे हवेली, खेड, दौंड आणि शिरूर तालुक्‍यांतील असल्याने त्याठिकाणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने घरोघरी सर्वेक्षण सुरुवात केली आहे. त्यामुळे करोनावर नियंत्रण मिळवण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्‍त केली आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बाधितांची संख्या तब्बल 20 हजारांपुढे गेली आहे. त्यामध्ये शहरालगत असलेला हवेली हा तालुका पहिल्या दिवसापासून हॉटस्पॉट ठरला असून, येथे 28 ग्रामपंचायत हद्दीत सर्वाधिक बाधित आहेत. त्यापाठोपाठ आता खेड, शिरूर, दौंड, मावळ, मुळशी हे तालुकेदेखील हॉटस्पॉट आहेत. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यात जवळपास साठ ग्रामपंचायतींमध्ये 15 पेक्षा अधिक बाधित संख्या होती. 

त्यामुळे याठिकाणी संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी सर्व यंत्रणा राबविण्यास सुरवात केली. मात्र, मागील आठ दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात प्रादुर्भाव झापाट्याने वाढू लागला असल्याचे चित्र आहे.
खेड तालुक्‍यात 14, शिरूरमध्ये 12, दौंड येथे 11, मुळशी आणि मावळ तालुक्‍यांत प्रत्येकी 9, आंबेगावमध्ये 4, जुन्नर, बारामती आणि भोर तालुक्‍यात प्रत्येकी 3 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर दहा पेक्षा जास्त बाधित असलेल्या 194 ग्रामपंचायती आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर यांनी दिली.

‘हॉटस्पॉट’ असलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
बारामती – माळेगाव बुद्रक, गुणवडी, पाणदरे
भोर – वेळू, भोंगवली, भोलावडे,
दौंड – कुरकुंभ, लिंगळी, बोरीपारधी, केडगाव, पाटस, वरवंड, यवत, राहू, गोपालवाडी, गिरीम, दौंड
मावळ – कामशेत, टाकवे बुद्रक, कुसगाव, वराळे, इंदोरी, सोमाटणे, सुदुंबरे, कार्ला, काले.
पुरंदर – सोनोरी, नीरा
खेड – निघोजे, मेदनकरवाडी, म्हाळुंगे, नाणेकरवाडी, खराबवाडी, कुरूळी, चऱ्होली खुर्द, काळूस, मरकळ, शेलगाव, शेल पिंपळगाव, चिंबळी, आंबेठाण, भोसे,
हवेली – मांजरी बुद्रुक आणि खुर्द, औताडेवाडी-हांडेवाडी, कदमवाक वस्ती, किरकटवाडी, कोल्हेवाडी, लोणीकाळभोर, लोणीकंद, नांदेड, कोंढवे-धावडे, पिसोळी, होळकरवाडी, उरळीकांचन, वाघोली, नऱ्हेगाव, केसनंद, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, देहू, खडकवासला, वडकी, शेवाळवाडी, थेऊर, सोरतापवाडी, खेड-शिवापूर, पेरणे, आव्हाळवाडी, वडगाव शिंदे, नायगाव.
जुन्नर – आळे फाटा, नारायणगाव
मुळशी – पिरंगुट, हिंजवाडी, मान, सूस, बावधन बुद्रुक, भूगाव, मारुंजी, पौड, म्हाळुंगे
शिरूर – सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, कारेगाव, मांडवगण फराटा, न्हावरा, कोरेगाव भिमा, केंदूर, रंजणगाव, रामलिंग, (ग्रामीण शिरूर), तर्डोबाची वाडी, निमगाव
आंबेगाव – घोडेगाव, मंचर, अवसारी, आंबेगाव

काय काळजी घ्याल?
– नागरिकांनी आपापसांत अंतर राखावे.
– फेसमास्कचा वापर करावा.
– वारंवार हात धुवावेत.
– दुकाने, कार्यालये व इतरत्र वावरताना दक्षता घ्यावी.

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिक या सर्वांच्या सहभागाने राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात टप्प्याटप्प्याने सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून संशयितांची कोविड-19 चाचणी करण्यात येणार आहे. या तपासणीचे उद्दिष्ट कोविड-19 बाबत प्रत्येक नागरिकांना शिक्षित करणे तसेच संशयित नागरिकांना तात्काळ शोधणे व त्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करणे हे आहे, यामुळे जिल्ह्यातील करोनामुळे वाढणारा मृत्यूदर कमी करता येईल.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी 

Leave A Reply

Your email address will not be published.