चिनी मांजाची माहिती देणाऱ्या नागरिकांना पोलीस देणार रोख बक्षीस
पुणे – पतंग उडवण्यासाठी बंदी असलेल्या चिनी मांजाच्या होणाऱ्या वापरामुळे पक्ष्यांसह माणसांच्याही जीवाला धोका असल्यामुळे पोलिसांकडून शहरातील पतंग व मांजा विक्री करणाऱ्या 97 दुकानांची सोमवारी रात्री उशिरापर्यंत झाडाझडती घेतली. मात्र, त्यामध्ये धोकादायक चिनी, नायलॉन मांजा आढळला नाही. तरीही छुप्या पद्धतीने होणाऱ्या मांजा विक्री करणाऱ्यांची नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यास, संबंधित व्यक्तीस पोलिसांकडून रोख रकमेचे बक्षीस मिळणार आहे.
मकर संक्रातीनिमित्त शहरातील हौशी नागरिक, लहान मुलांकडून पतंग उडवण्यास प्राधान्य दिले जाते. काही जणांकडून मात्र पतंग उडवण्यासाठी चिनी, नायलॉन मांजाचा वापर होत असल्याच्या घटना मागील काही वर्षांपासून सुरू आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन शहरांमध्ये दोन तरुणींना मांजामुळे आपला जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झाले.
याबरोबरच हजारो पक्ष्यांनाही जीवाला मुकावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर मागील वर्षापासून पुणे पोलिसांकडून चिनी मांजाविरुद्ध ठोस कारवाई करण्यावर भर दिला जात आहे.
पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनानुसार, पोलिसांनी यावर्षीही चिनी मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी गुन्हे शाखेची सात पथके तयार केली होती. या पथकासह शहरातील पोलीस ठाण्यांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पतंग व मांजा विक्री करणारे 97 दुकानांची झाडाझडती घेतली.
रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरातील पतंग व मांजा विक्रीची दुकाने तपासण्यात आली. त्यामध्ये पोलिसांना बंदी असलेला मांजा आढळून आला नाही. मात्र, ही कारवाई सुरूच राहाणार असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले. तसेच छुप्या पद्धतीने मांजा विक्री करणाऱ्यांची नावे नागरिकांकडून घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
नावे गुप्त ठेवणार
मांजा विक्री करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या नागरिकांची नावे गुप्त ठेवली जाणार आहेत. तसेच संबंधित नागरिकांना एक हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक ः
पोलीस नियंत्रण कक्ष : 100 किंवा 8975283100, 8975953100
चिनी मांजाची विक्री होण्याची शक्यता लक्षात घेऊन 97 दुकानांमध्ये छापे टाकले, मात्र तेथे मांजा आढळलेला नाही. यापुढेही कारवाई सुरू राहील. नागरिकांनी चिनी मांजाबाबत माहिती दिल्यास, त्यांना रोख बक्षीस दिले जाईल. तसेच विक्रेत्यावर कडक कारवाई होईल.
– अशोक मोराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे