पुणे – देशभरातील विविध शहरांना पुण्याशी जोडण्यासाठी महत्त्वाचा दुवा असलेले पुणे रेल्वे स्थानक सोमवारी 95व्या वर्षात पदार्पण करत आहे. सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या पुणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असून, सर्व प्रवाशांची अविरतपणे सेवा करत स्थानक सक्षमतेने कर्तव्य बजावत आहे.
स्थानकाचे पहिले डिझाइन 1915मध्ये तयार झाले. या वास्तुचे काम पी. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली 1922 मध्ये सुरू झाले. तर, 1925 मध्ये काम पूर्ण होऊन 27 जुलै 1925 रोजी तत्कालिन गव्हर्नरने स्थानकाचे उद्घाटन केले. 1853 मध्ये भारतात बोरीबंदर ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली. त्यानंतर काही वर्षांतच पुणे-मुंबई लोहमार्ग बांधून झाला. सध्या पुणे स्थानकातून 200 हून अधिक रेल्वेगाड्यांद्वारे लाखो प्रवासी दररोज ये-जा करतात. याशिवाय लोकलदेखील धावतात.
पुणे स्थानकातून सुटणारी डेक्कन क्वीन विशेष सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. स्थानकातील सहा प्लॅटफॉर्म अपुरे पडत आहेत. स्थानकाचा विस्तार, स्थानकाच्या आवारातील सुरक्षा, अनाधिकृत प्रवेशद्वारे, पार्किंग व्यवस्था, स्थानकाच्या आवारातील वाहतूक व्यवस्था आदी काही प्रमुख आव्हाने आहेत. “पुणे स्थानकाला जागतिक दर्जाचे स्थानक करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. सध्याचे रेल्वे स्थानक बहुमजली केल्यास एकाच ठिकाणाहून लोकल, मेट्रो, बस आणि अन्य वाहतूक होऊ शकते,’ असे मत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केले.
असे झाले होते स्थानकाचे सहस्रचंद्रदर्शन
“27 जुलै 2005 रोजी रेल्वे स्थानकाच्या वास्तूने 81 व्या वर्षांत पदार्पण केले. त्या निमित्ताने प्रवासी संघाने स्थानकाच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन केले होते. त्या दिवशी प्रचंड पाऊस होता. मुंबईत पूर आल्याने रेल्वे वाहतूक ठप्प होती. त्यामुळे सर्व गाड्या पुण्यात थांबल्या. या शेकडो प्रवाशांना पाणी, जेवण आदी सुविधा देण्याचा हा कार्यक्रम तीन दिवस सुरू होता. कार्यक्रमाचे नियोजन वेगळे होते. मात्र, प्रवाशांची 3 सेवा दिवस करण्याचे भाग्य मिळाले,’ असे शहा यांनी सांगितले.