पालिकेतील आर्थिक स्थिती : पहिल्या नऊ महिन्यांत 35 टक्के बजेट वापरले
विकासकामांवर 632 कोटींचा खर्च, आचारसंहितेचा परिणाम
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सन 2019-20 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत केवळ 35 टक्के बजेट खर्च झाले आहे. त्यामध्ये विकासकामांवर (भांडवली) 632.50 कोटी रुपये झाला आहे. तर, विकासकामांपेक्षा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर (महसुली) तब्बल 940.15 कोटी रुपये खर्च झाले आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे तीनच महिने आर्थिक वर्ष संपण्यासाठी शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत विकासकामांचा सपाटा सुरु होण्याची शक्यता आहे.
महापालिकेचे 2019-2020 या आर्थिक वर्षाचे मूळ बजेट 4 हजार 590 कोटी तर सुधारित चार हजार 966 कोटी 85 लाख रुपयांचे आहे. आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत 35 टक्के बजेट खर्ची पडले आहे. या आर्थिक वर्षात लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दोन आचारसंहिता आल्या. लोकसभेची तब्बल तीन महिने आचारसंहिता होती. तर, विधानसभेची दीड महिने आचारसंहिता होती. त्यामुळे विकासकामांचा खोळंबा झाला होता. विकासकामे रखडली होती.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत आतापर्यंत विकासकामांवर 632.50 कोटी रुपये खर्च झाले आहेत. केवळ 25.66 टक्के विकासकामांवर खर्च झाला आहे. त्यामध्ये स्थापत्य, विद्युत, पाणी पुरवठ्यासह विविध विकासकामांचा समावेश आहे. तर, वेतनावर विकासकामांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. वेतनावर तब्बल 940.15 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आर्थिक वर्ष संपण्यासाठी तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे आता विकासकामांचा धडाका सुरु होईल. मोठ्या प्रमाणात नवीन विकास कामे काढली जाण्याची शक्यता आहे.
80 टक्के बजेट खर्च होणार – कोळंबे
याबाबत बोलताना लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे म्हणाले, महापालिकेच्या 2019-20 या आर्थिक वर्षातील आजपर्यंत 35 टक्के बजेट खर्ची झाले आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी तीन महिने शिल्लक आहेत. आगामी काळात विकासकामांसाठीचा खर्च वाढेल. गतवर्षी 75 टक्के बजेट खर्ची पडले होते. यावर्षी 80 टक्के बजेटचा खर्च करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.