93 वे साहित्य संमेलन उस्मानाबादेत

“संमेलनाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार?’

पुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे हे 93 वे वर्ष असून, यंदा त्याचे यजमानपद उस्मानाबादला देण्यात आले आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येणाऱ्या मागणीनुसार यंदाचे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या उस्मानाबाद येथे होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेकडून मागील अनेक वर्षांपासून संमेलन व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेरीस या मागणीला न्याय दिला असून, यंदाचे संमेलन घेण्याचा मान उस्मानाबादकरांना मिळणार आहे.

महामंडळाने समितीच्या पाहणीचा अहवाल आणि परिपत्रके 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्यासह एकोणीस सदस्यांना पाठवली होती. याबाबत सदस्यांकडून उस्मानाबादची निवड करण्यात आल्याने सर्वांसाठी सुखद धक्का होता, अशी भावना महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

गेल्या अनेक वर्षांपासून होणाऱ्या मागणीचा यंदा विचार करण्यात आला. महामंडळाच्या स्थळनिवड समितीने नाशिक आणि उस्मानाबाद या शाखांकडून संमेलन घेण्याबाबतच्या मागणीनुसार समितीने या ठिकाणांची पाहणी केली. त्यानुसार पाहणीचा अहवाल महामंडळाला सादर करण्यात आला. संमेलनासाठी अनुकूल वातावरण असल्याने पदाधिकारी आणि सदस्यांच्या एकमताने उस्मानाबादची निवड करण्यात आली, असे समितीचे सदस्य प्रकाश पायगुडे यांनी सांगितले.

ऑक्‍टोबरदरम्यान संमेलनाध्यक्षांची निवड
संमेलनाच्या ठिकाण जाहीर केल्याने संमेलनाचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे साहित्य विश्‍वात यंदाच्या संमेलन पदाची धुरा कोणाच्या खांद्यावर येणार याची चर्चा होत आहे. मागील वर्षी निवडणूक पद्धत रद्द करत निवड पद्धतीचा नवा पायंडा पाडण्यात आला आहे. त्यामुळे या नव्या पद्धतीनुसार यंदा “संमेलनाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार’ या चर्चेला देखील उधाण आहे. दि. 3 ते 6 जानेवारीच्या सुमारास हे संमेलन होईल अशी शक्‍यता साहित्य क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. या चर्चांमुळे ऑक्‍टोबरदरम्यान होणारी संमेलनाध्यक्षांची निवड औत्सुक्‍याचा विषय ठरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)