डीएसकेंच्या संपत्तीचा लिलाव करण्याबाबत 93 हरकती, सूचना

पुणे – बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याबाबत येथील विशेष न्यायालयात 93 हरकती व सूचना दाखल झाल्या आहेत. या हरकती व सूचना निकाली काढण्यात आल्यानंतर लिलावाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि राज्य शासनाने डीएसके व त्यांच्या कुटुंबीयांच्या जप्त केलेल्या 463 स्थावर आणि जंगम संपत्तीचा लिलाव करण्यासाठी जाहीर नोटीस काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार 93 हरकती व सूचना आल्याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. या प्रकरणात नुकतीच 250 कोटीची नवीन संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या संपत्तीची किंमत आता एक हजार 400 वरून एक हजार 650 कोटी झाली आहे. डीएसके यांच्याकडे एकूण 46 वाहने असून त्यातील 20 जप्त करण्यात आली आहेत. जप्त वाहनांपैकी 13 आलिशान गाड्यांचा 15 फेब्रुवारी रोजी लिलाव होण्याची शक्‍यता आहे. या वाहनांची किंमत दोन कोटी 57 लाख 50 हजार रुपये आहे.

वाहन नावावर करून देण्याची ठेविदाराची मागणी
ठेवीदार करणसिंग परदेशी यांना डीएसकेंकडून 10 लाख 35 हजार रुपये येणे आहेत. त्याबाबत डीएसकेंनी परदेशी यांना परतफेडीबाबत धनादेश दिले होते. मात्र संबंधित रक्कम देण्यास वेळ लागत असल्यास परदेशी यांनी ऍड. सुदीप केंजळकर यांच्या मार्फत अर्ज केला आहे. डीएसकेंच्या जप्त केलेल्या वाहनांपैकी माझी रक्कम मिळेल एवढ्या किमतीचे चारचाकी वाहन नावावर करून द्यावे, अशी मागणी परदेशी यांनी अर्जाद्वारे केली आहे. त्यावर अद्याप सरकारी पक्षाचे म्हणणे येणे बाकी असल्याचे ऍड. केंजळकर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.