पाथर्डी, शेवगाव तालुक्यात शंभर टक्कांपेक्षा जास्त पाऊस
अनेक ठिकाणी सलग दोन दिवस जोरदार पाऊस बरसला
नगर – नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. शनिवार व रविवार दोन दिवस जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 91 टक्के पाऊस झाला आहे. त्यात अकोले, पाथर्डी, शेवगाव, कोपरगाव या चार तालुक्यांत शंभर टक्के पाऊस झाला आहे.
तालुक्यांतील पावसाची तुलना केल्यास अकोले तालुक्यापेक्षा जास्त पाऊस यंदा पाथर्डी तालुक्यात झाला आहे. अकोले तालुक्यात सरासरी 112 टक्के पाऊस झाला आहे. तर पाथर्डी तालुक्यात सरासरी 135 टक्के पाऊस झाला आहे. तर शेवगाव तालुक्यात 111.6 टक्के पाऊस झाला आहे.
या दोन तालुक्यांतील सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे दुष्काळी असलेल्या पाथर्डी व शेवगावच्या काही भागात अतिवृष्टीने नुकसान झाले आहेत. त्यात घरांचे नुकसान झाले आहेत. शेती वाहून गेली आहे. या तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे पावसाची टक्केवारी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 90 टक्कांवर गेली आहे. नगर नगर शहर व तालुुक्यात 89 टक्के पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकत्रितपणे 448 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सरासरी जिल्ह्यात 91.3 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वदूर, शनिवार व रविवारी ही जोरदार पाऊस झाला आहे. आणखी दोन दिवस अतिवृष्टीचे इशारा ही देण्यात आला आहे.
गेल्या वर्षीही जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाला होता. त्यामुळे जास्त पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा ही सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 91 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा ही जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे.