कोविड नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेकडून मनुष्यबळ उपलब्ध
पुणे – शहरासह जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत रुग्णालयातील मनुष्यबळ अपुरे ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर मागील पंधरा दिवसांत जिल्हा परिषदेकडून कंत्राटी स्वरुपात तब्बल 901 मनुष्यबळ उभे केले असून, त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांच्यासह नर्स, आरोग्य सेविका, क्ष-किरण तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरासह ग्रामीण भागात करोनाची दुसरी लाट सुरू झाली. अवघ्या महिन्याभरात या लाटेने जिल्ह्यात कहर माजवायला सुरुवात केली. विशेषत: ग्रामीण भागात बाधितांची संख्या दुप्पट ते तीप्पटीने वाढू लागल्यामुळे उपचारासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली. अशा परिस्थितीत ग्रामीणमध्ये रुग्णांना उपचार देताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य विभागावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. पुरेशे मनुष्यबळ नसल्यामुळे कोविड सेंटरही बंद ठेवण्यात आले. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ ठोस पावले उचलत कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार मागील पंधरा दिवसांत (31 मार्च ते 15 एप्रिल) 28 एमबीबीएस डॉक्टर, 54 बीएएमएस डॉक्टर, 78 बीडीएस डॉक्टर यांची नियुक्ती केली. त्याचबरोबर 114 स्टाफ नर्स, 400 आरोग्य सेविका, 130 डाटा ऑपरेटर, 15 क्ष-किरण तंत्रज्ञ, 8 इसीजी तंत्रज्ञ आणि 9 हॉस्पिटल मॅनेजर यांची नियुक्ती केली आहे. 13 तालुक्यांसाठी ही नियुक्ती असून, त्यामध्ये एमबीबीएस डॉक्टरांची संख्या तुलनेने कमी होती.
मात्र, दोन दिवसांपूर्वी केवळ 6 एमबीबीएस डॉक्टर कार्यरत होते, तर आज नव्याने भरती केल्यामुळे एमबीबीस डॉक्टरांची संख्या 28 झाली आहे. त्यामध्ये हिंजवडी येथील विप्रो रुग्णालयात 5, बारामतीमध्ये 4, खेड आणि जुन्नर तालुक्यात प्रत्येकी 3, तर आंबेगाव, भोर, इंदापूर, पुरंदर, शिरूर आणि वेल्हा तालुक्यांत प्रत्येकी 2 आणि दौंड तालुक्यात 1 एमबीबीएस डॉक्टर कार्यरत आहे. मुळशी, मावळ आणि जवेली तालुक्यात बीएएमएस डॉक्टर अद्याप नियुक्त आहे.
तालुकानिहाय भरलेले मनुष्यबळ
आंबेगाव – 54, बारामती – 72, भोर – 58, दौंड – 51, हवेली – 81, इंदापूर – 70, जुन्नर – 63, खेड – 69, मावळ – 50, मुळशी – 35, पुरंदर – 55, शिरूर – 68, वेल्हा – 45, विप्रो (हिंजवडी) – 130