लंडन – कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून परदेशी पळून गेलेले भारतातील विजय मल्ल्या किंवा निरव मोदी साऱ्यांनाच ठाऊक आहेत. पण या दोघांवरही मात करणारी एक महिला असून तब्बल नऊ हजार कोटी रुपयांचा घोटाळा तिने केला आहे. ब्रिटिश पोलिसांनी या महिलेला तब्बल नऊ वर्षांनी स्पेनमध्ये अटक केले आहे.
ब्रिटिश तपास अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये या महिलेचे नाव मोस्ट वॉन्टेड होते सारा पानीट्झगे असे या महिलेचे नाव असून घोटाळा करून पलायन केल्यानंतर ती स्पेनमध्ये विविध नावे धारण करून राहत होती.
मादरीड शहरातील एका छोट्या गल्लीत सकाळी कुत्र्याला फिरवण्यासाठी ती बाहेर पडली आणि अलगद पोलिसांच्या हातात लागली. अशा प्रकारची महिला या ठिकाणी रहात असल्याची कुणकुण खबऱ्यांनी दिली होती मूळची इंग्लंडमधील यॉर्कशायर येथे राहत असणाऱ्या साराने स्पेनमध्ये जाण्यापूर्वी इटालियन नाव धारण करून याबाबतची सर्व कागदपत्रे बनावट पद्धतीने जमवली होती. त्या कागदपत्रांच्या आधारे पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले.
साराला स्पेन मधून ब्रिटनमध्ये आणण्यासाठी प्रत्यर्पण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पण आपल्यावर स्पेन मध्येच खटला दाखल करावा अशी साराने मागणी केली आहे. पण तिचे सगळे गुन्हे ब्रिटनमध्ये घडले असल्याने ही याचिका फेटाळण्यात आली असून लवकरच तिला ब्रिटनमध्ये पाठवण्यात येईल. सारा ब्रिटनमधून फरार झाली असतानाही तिच्यावर खटला चालवण्यात आला होता. आणि गेल्या वर्षी या खटल्याचा निकाल लावून तिला आठ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
ही शिक्षा मी स्पेनमध्ये भोगण्यास तयार आहे. अशी याचिका साराने दाखल केली होती. ती फेटाळली असून स्पेनचे अधिकारी तिला आता ब्रिटनच्या ताब्यात देणार आहेत.