900 शिक्षकांची “टीईटी’ प्रमाणपत्रे बोगस?

शाळांकडून शिक्षकांची “टीईटी’ची प्रमाणपत्रे जातात दडवली


शिक्षणाधिकाऱ्यांचा शाळांवर वचक नसल्याचा परिणाम

पुणे – राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सुमारे नऊशे शिक्षकांची शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) प्रमाणपत्रे बोगस असण्याची शक्‍यता आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांचा शाळांवर वचकच राहिला नसल्याने संबंधित शाळांकडून शिक्षकांची “टीईटी’ची प्रमाणपत्रे दडवूनच ठेवण्यात आलेली आहेत. यामुळे ही प्रमाणपत्रे तपासणीसाठी दाखलच होत नसल्याची बाबपुढे आली आहे.

राज्यात 13 फेब्रुवारी 2013 नंतर विविध शाळांमध्ये शिक्षकांच्या पदांवर नोकरीला लागलेल्या शिक्षकांना “टीईटी’ची परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. प्राथमिक शाळांमध्ये 1 हजार 500 व माध्यमिक शाळांमध्ये 500 असे एकूण 2 हजार शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांना “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन वेळा संधी देण्यात आली होती. मात्र, यात फारसे शिक्षकांना यश मिळाले नाही. त्यानंतर शासनाकडून 30 मार्च 2019 पर्यंत “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती;अन्यथा सेवा संपुष्टात आणण्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला होता.

“टीईटी’ परीक्षा पात्र नसलेल्या शिक्षकांचे वेतनही थांबविण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून सहानुभूतीचा विचार करून तो निर्णय मागे घेण्यात आला. कधी ना कधी आपली नोकरी गोत्यात येईल या धसक्‍यानेच शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे एजंटांकडून तयार करून घेतल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

शिक्षकांची “टीईटी’ची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत, असे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी जानेवारी 2019 मध्ये प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांना दिले होते. त्यानुसार या दोन्ही शिक्षण संचालकांकडून जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकारी, महापालिकांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून “टीईटी’ प्रमाणपत्रासह अहवाल सादर करण्याचे वारंवार आदेश दिले आहेत. मात्र शिक्षणाधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची फारशी गांभीर्याने दखलच घेण्यात आलेली नाही हे स्पष्ट होऊ लागले आहे.

शिक्षण संचालकांना पुन्हा सक्त सूचना देणार
राज्यातील सर्व शिक्षकांची “टीईटी’ची प्रमाणपत्रे तपासणीसाठी तत्काळ दाखल व्हावीत यासाठी आता पुन्हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांना सक्त सूचना देण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

बोगस प्रमाणपत्र तयार करणारे एजंटाचे रॅकेट
राज्यातील पुणे, मुंबई, अहमदनगर, नाशिक, नांदेड, जळगाव, लातूर, बीड, धुळे, उस्मानाबाद, नंदूरबार या जिल्ह्यातील सर्वाधिक शाळांमधील शिक्षकांची “टीईटी’ची प्रमाणपत्रे बोगस असण्याची खूप शक्‍यता आहे. काही शिक्षकांनी “टीईटी’ परीक्षेतील गुणांच्या फेरतपासणीचे कारण पुढे करून बोगस प्रमाणपत्र तयार करून घेतली असावीत. बोगस प्रमाणपत्रे तयार करणारे एजंटाचे मोठे रॅकेटची सक्रिय असल्याची दाट शक्‍यता आहे, असा दावाही अधिकाऱ्यांकडून करण्यात येऊ लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.