पुणे : चांगल्या सवयी लावून घेणे कठीण असते, पण चांगल्या सवयींसह जगणे सोपे असते. शाळेत शिकवल्या जाणारा ९० टक्के अभ्यासक्रम निरुपयोगी आहे. अंधश्रद्धेने आपले खूप नुकसान केले आहे. आज सुशिक्षितही अंधश्रद्धांना बळी पडत आहेत हे दुर्दैवी आहे, अशी खंत ज्येष्ठ लेखक आणि प्रेरक वक्ते शिव खेरा यांनी व्यक्त केली.
पुणे पुस्तक महोत्सवातील पुणे साहित्य महोत्सवाचे उद्घाटन यांच्या खेरा यांच्या हस्ते फर्गसन महाविद्यालयातील अॅम्फी थिएटरमध्ये झाले. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे या वेळी उपस्थित होते.खेरा म्हणाले, माणसाची उंची नेहमी मानेवर मोजली जाते. ज्या गोष्टी बदलता येणार नाही त्या बदलण्यात वेळ घालवला जातो. त्यातून केवळ तणाव निर्माण होतो. आयुष्य हा एक निर्णय आहे आणि तडजोडही आहे. अनेकदा आपण घेतलेले निर्णयच आपल्याला नियंत्रित करतात आणि त्यामुळे आपले स्वातंत्र्यही संपुष्टात येते.
चुकांच्या पुनरावृत्तीने अपयश आणि चांगल्या कामांच्या पुनरावृत्तीने यश मिळते. आपणच स्वतःची समस्या असतो. काहीवेळ चांगल्या गोष्टी होण्यासाठी कठोर व्हावे लागते. काही मूलभूत गोष्टी नीट होतील, तेव्हाच देश पुढे जाईल. आयुष्यातील पहिले खोटे बोलणे अवघड असते. त्यानंतर त्याची सवय होते.
पुणेकरांनी पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी केला आहे. यंदापासून पुणे साहित्य महोत्सव सुरू होत आहे. हा महोत्सव देशातील मोठा महोत्सव म्हणून नावारुपाला येईल हा विश्वास आहे, असे राजेश पांडे यांनी नमूद केले.
मुलांना अपयश पचवायला शिकवा
सध्या मुलांना यश आणि जिंकणे एवढेच सांगितले जाते. त्यांना अपयश पचवण्याबाबत शिकवले जात नाही. त्यामुळे आजच्या मुलांमध्ये नैराश्यात वाढ झाली आहे. अपयश हे आयुष्यातील वास्तव आहे, असे मत शिव खेरा यांनी मांडले.