“या’ राज्यात नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ‘ढकलणार…’

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारचा निर्णय

चेन्नई – नॉव्हेलकरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाने पसरलेल्या कोव्हिड-19 ची महामारीची साथ, सतत वाढणारी रुग्णसंख्या, लॉकडाऊनची टांगती तलवार आणि अनलॉक प्रक्रियेतील कच्चे दुवे यामुळे शाळा-महाविद्यालये सुरु करता आल्या नाहीत. ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाची प्रक्रिया अद्याप शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पडलेली नाही. शिवाय कठिण विषय समजून घेताना शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास कच्चा राहिलेला आहे.

अशा स्थितीत वार्षिक परीक्षा घेणे अन्यायकारक ठरेल आणि विद्यार्थ्यांचे वर्षही वाया जायला नको, या हेतूने तामिळनाडूच्या शिक्षण विभागाने इयत्ता नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता यावर्षी फक्त बारावीच्या परीक्षा होतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ए. पलानीस्वामी यांनी ही घोषणा केली.

राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रकही राज्य मंडळाने जारी केले आहे. परीक्षा 3 ते 21 मे दरम्यान आयोजित केली जाईल. तामिळनाडूतील शाळा 19 जानेवारीपासून उघडण्यात आल्या होत्या. दहावी आणि बारावीचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले होते. तामिळनाडू सरकारने त्या विद्यार्थ्यांसाठी निवासी सुविधा पुरवण्याची देखील परवानगी दिली आहे, ज्यांना बारावी बोर्ड परीक्षांना उपस्थित राहायचे आहे.

दरम्यान, कोरोना काळात भारतातील शून्य ते चार वयोगटातील तब्बल 37.5 कोटी बालकांच्या आरोग्याचे आणि शिक्षणाचे मोठं नुकसान झालं आहे असं सेंटर फॉर सायन्स ऍन्ड एन्व्हायरमेन्टचा अहवाल सांगत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.