किव्ह – रशियाने युक्रेनमधील चार प्रांतांमध्ये सार्वमत घेतल्याचे दाखवून हे प्रांत रशियामध्ये सामील करून घेतल्यानंतर “नाटो’चे सदस्य असलेल्या युरोपातील 9 देशांनी या मुद्द्यावरून युक्रेनला पाठिंबा देऊ केला आहे. युक्रेनला “नाटो’चे सदस्य करून घेण्यात यावे अशी आग्रही मागणी करणारे संयुक्त निवेदन या देशांनी प्रसिद्धीस दिले आहे.
“नाटो’चे सदस्यत्व मिळण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांनी शुक्रवारी अचानक हालचाली सुरू केल्या होत्या. युक्रेनला “नाटो’चे सदस्य मिळण्यासाठी सदस्य असलेल्या सर्व 30 देशांची संमती मिळणे आवश्यक आहे. मात्र, युक्रेनमधील युद्धामुळे ही प्रक्रिया आणखीन काही काळ रेंगाळण्याची शक्यता आहे.
मात्र, तेवढ्या काळात रशियाकडून युक्रेनचा आणखीन भूभाग बळकावला जाऊ शकतो, अशी भीती झेकिया, एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, उत्तर मॅसेडोनिया, मॉन्टेनेग्रो, पोलंड, रोमानिया आणि स्लोव्हाकिया या 9 देशांनी व्यक्त केली आहे आणि युक्रेनच्या सदस्यत्वाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.