मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाने प्रचार सभांवर जोर दिला आहे. अनेक दिग्गज नेते आपापल्या परीने आपल्या पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यातच आता राज्यात युतीचे सरकार आणण्यासाठी भाजप आणि शिवसेना प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान, राज्यात त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सभा विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागांत होतील अशा रीतीने नियोजन करण्यात आले आहे.
रविवारपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अखेरच्या टप्यात मोदी महाराष्ट्राच्या प्रचारात उतरणार आहेत. चार दिवसांत त्यांच्या तब्बल 9 सभा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या खासदारपदावरून थेट नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊन पक्षाबाहेर पडणारे नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा क्षेत्रात पहिल्याच दिवशी मोदी यांची सभा होणार आहे. साकोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती व राज्यमंत्री परिणय फुके पटोले यांच्यासमोर उभे आहेत.
13 ऑक्टोबरला जळगाव व साकोलीमध्ये सभा होणार आहे. त्यानंतर 16 ऑक्टोबरला अकोला, परतूर, पनवेल या ठिकाणी सभा होईल. 17 ऑक्टोबरला पंकजा मुंडे यांच्या परळी मतदारसंघात मोदी सभा घेतील. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा निवडणुकीच्या तर त्यांचे चुलत बंधू शिवेंद्रराजे भोसले यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी साताऱ्यात जातील.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीमुळे व कोथरूडमधील उमेदवारी चर्चेत आलेल्या पुण्यात मोदी यांची सभा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेवटची सभा मुंबईत 18 ऑक्टोबरला होईल. ही शिवसेना व भाजपची संयुक्त सभा असेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्यात सहभागी होतील.