शोधला “परफेक्ट मॅच’; निघाला भामटा

वेबसाइटवर नवरोबा शोधणाऱ्या महिलेस 9 लाखांचा गंडा

पुणे  – “जीवनसाथी डॉट कॉम’ वेबसाइटवर जोडीदार शोधणाऱ्या एका महिलेस 9 लाखांचा गंडा घालण्यात आला. विवाहाचे आमिष दाखवत रोख आणि धनादेश घेऊन तथाकथित साथीदाराने पलायन केले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एका 34 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार समीर जोशी उर्फ जगन्नाथ पाटकुले (रा. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला बड्या कंपनीत टीम लिडर आहे. तिने “जीवनसाथी डॉट कॉम’वर विवाहासाठी नोंदणी केली होती. तीच्या मोबाइलवर आरोपीने समीर जोशी नावाने संपर्क साधला. स्वत: मलेशियातील एका बड्या कंपनीत कामाला असल्याचे सांगितले. यानंतर भारतात आल्याचे सांगत प्रत्यक्षात फिर्यादीची भेट घेतली. फिर्यादीशी सातत्याने भेट घेत तिचा विश्वास संपादन करण्यात आला. यानंतर संगणक व ईतर साहित्य घेण्यासाठी फिर्यादीकडून रोख व धनादेश स्वरुपात तब्बल 9 लाखांची रक्कम वेळोवळी घेतली. त्यांच्या भेटीचा आणि पैशांचा व्यवहार फेब्रुवारीपासून चालला होता.

 

दरम्यान, तब्बल नऊ लाखाची रक्कम घेतल्यावर आरोपी समीरने फिर्यादीशी संपर्क तोडला. प्रथम त्याने फिर्यादीला व्हॉट्स ऍपवर ब्लॉक केले. यानंतर त्यांचे कॉलही स्वीकारणे बंद केले. फिर्यादीला याचा संशय आल्याने त्यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. याची चौकशी केली असता, जगन्नाथ पाटकुले नावाच्या व्यक्तीने समीर जोशी नावाने प्रोफाइल बनवून फिर्यादीला गंडा घातल्याचे उघड झाले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास राऊत करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.