करंदी येथील एकावर फसवणूक प्रकरणी गुन्हा
शिक्रापूर (पुणे) – करंदी (ता. शिरूर) येथील कुटुंबीयांच्या खेड तालुक्यात संपादित झालेल्या जमिनीचा मिळालेला मोबदला स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केली. याप्रकरणी एकावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय खरपुडे (रा. करंदी, ता. शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत हर्षल खंडू खरपुडे (रा. करंदी) यांनी फिर्याद दिली. खेड तालुक्यातील कन्हेरसर येथील वडिलोपार्जित जमीन असलेल्या काशिनाथ खरपुडे यांच्या नावे जमीन गट नंबर 575 मधील 157 गुंठे जमीन क्षेत्र संपादित झालेले आहे. त्या जमिनीचा शासकीय मोबदला या कुटुंबायांतील मूळ मालकाचे वारसदार असलेल्या सहा जणांना मिळणार होता. हा मोबदला एकाच व्यक्तीच्या नावे लवकर मिळविण्यासाठी सर्वांनी मिळून दत्तात्रय खरपुडे यांना संमतीपत्र लिहून दिलेले होते. त्यानंतर दत्तात्रय यांनी जमिनीचे मिळालेली रक्कम ही अकरा लाख रुपये असल्याचे सांगत त्याप्रमाणे भावकीतील चुलते, चुलतभाऊ यांच्या कुटुंबातील सदस्यांना वाटप केले; मात्र या जमिनीची मोबदला रक्कम 20 लाख 55 हजार इतकी आलेली होती. यात इतर वारसदार सदस्यांना केवळ 10 लाख 58 हजार रुपयांचे वाटप करून स्वतःच्या फायद्यासाठी 9 लाख 97 हजार रुपयांचा अपहार केला असल्याचे समोर आले. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर व हवालदार प्रशांत गायकवाड हे करीत आहेत.