वॉशिंग्टन : अमेरिकेच्या साऊथ डकोटा येथे शनिवारी रात्री एका प्रवासी विमानाला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या विमानातून 12 लोक प्रवास करत होते. चेंबरलेन येथून उड्डाण करुन हे विमान इदाहो फॉल्सकडे निघाले होते. ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने याविषयी माहिती दिली आहे. विमानाच्या उड्डाणापूर्वी चेंबरलेन आणि सेन्ट्रल साऊथ डकोटामध्ये बर्फाच्या वादळाचा इशारा देण्यात आला होता.
9 people died in plane crash in South Dakota in United States: US Media pic.twitter.com/1RsAVN7aCe
— ANI (@ANI) December 1, 2019
या अपघाताबाबत माहिती देताना ब्रूल काऊंटीच्या ऍटोर्नी थेरेसा मौल रॉसोव यांनी सांगितले की, मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. जखमी झालेल्या तिघांना सियोक्स फॉल्स येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मात्र, जखमींच्या प्रकृतीबाबत अद्याप कुठलीही माहिती दिली जाऊ शकत नाही. प्रतिकूल हवामानातही घटनास्थळी दाखल होत बचाव कार्यात सहभागी झालेल्यांनी मोठ्या धाडसाने मदत कार्य राबवले आणि जखमींना वाचवल्याचे रॉसोव यांनी सांगितले.