काबूल – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज सकाळी झालेल्या एका काराबॉम्बच्या स्फोटत किमान 9 जण ठार झाले. अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाच्यावतीने ही माहिती देण्यात आली. या स्फोटात किमान 20 जण जखमी झले.
त्यामध्ये खान मोहम्मद वर्डाक या खासदाराचाही समावेश आहे. त्यांची प्रकृती आता ठीक असून स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे गृहमंत्री मसूद अंदाराबी यांनी हल्ल्याच्या ठिकाणी पत्रकारांना सांगितले.
खासदार वर्डाक यांच्या वाहनाचा ताफा काबुलमधील खोसल खान शेजारच्या एका चौकातून जात असताना हा हल्ला झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की त्यामुळे आजूबाजूची वाहनेही पेटली. तसेच जवळपासच्या इमारती व दुकानांचेही नुकसान झाले. या हल्ल्याची कोणीही ताबडतोब जबाबदारी स्वीकारली नाही.
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशर्रफ् घनी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. शांतता प्रक्रिया सुरू असताना तालिबानने नागरी परिसरामध्ये हिंसाचार करणे थांबवावे, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र या हल्ल्याला तालिबान जबाबदार असल्याचे घनी यांनी म्हटलेले नाही.
अलिकडच्या महिन्यांमध्ये काबूलमध्ये इस्लमिक स्टेटशी संबंधित गटांकडून अशाप्रकारचे बॉम्बस्फोट केले जात आहेत. काबूलमधील शिक्षणसंस्थांवर इसिसने काही दिवसांपूर्वी केलेल्या हल्ल्यात 50 विद्यार्थी ठार झाले होते. अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या तळांवर दोनच दिवसांपूर्वी झालेल्या रॉकेट हल्ल्याची जबाबदारीही इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे.